मुंबई: केंद्र सरकारकडून तरुणांच्या शिक्षण, काैशल्य आणि रोजगारासाठी राबविण्यात आलेल्या योजनांविषयीचा जागर आता भाजपकडून करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाच्या वतीन ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून केंद्र सरकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थी व तरुणांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध महत्त्वपूर्ण शैक्षणिक व कौशल्य विकास उपक्रमांची सविस्तर माहिती फलकांच्या (बॅनर्स) माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणा, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी२०२०), पीएम श्री शाळा, पीएम ई-वैद्य आणि दीक्षा संकेतस्थळ, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना केले जाणारे आर्थिक सहकार्यासाठीच्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना, प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना तसेच आयआयटी, आयआयएम आणि एम्स या देशांतर्गत उच्च शिक्षण योजनांच्या झालेल्या विस्ताराची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्किल इंडिया अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पीएम सेतू योजनातांची माहितीही दिली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा मोहिमेविषयीची माहितीही या फलकांद्वारे प्रसारित केली जाणार आहे.

‘धन्यवाद मोदीजी’ हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून देशाच्या युवा शक्तीने अनुभवलेल्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चाचे कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सर्वांनी या कृतज्ञता सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. भारताकडे असलेली जगातील सर्वाधिक युवा शक्ती हीच देशाची मुख्य ताकद आहे. या ताकदीची जाणीव असलेल्या विरोधी व देशविरोधी शक्ती खोटे आरोप आणि अपप्रचाराच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु, हा अपप्रचार आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उत्तर देऊन सत्य जनतेसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया उपक्रमाविषयीची माहिती देताना कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.