सौरपंप खरेदीत घोटाळा नसल्याचा ऊर्जामंत्र्यांचा दावा
महाराष्ट्र आणि गुजरातमधील सौरपंप खरेदीत कोणताही घोटाळा नसून निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तीमध्ये आमूलाग्र फरक असल्याने किंमत अधिक असल्याचा दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील कंत्राट सर्वोत्तम असल्याचा दावा करीत उत्तर प्रदेशच्या वीज वितरण कंपनीने काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजावलेल्या ब्राइट सोलार कंपनीला गुजरात सरकारने सौरपंप पुरविण्याचे कंत्राट बहाल केल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील सरकार कशा पद्धतीने काम करीत आहे, हे उघड होत आहे.
महावितरणने खरेदी केलेले सौरपंप गुजरातपेक्षा किमान एक लाख रुपयांनी महाग पडले असून यात घोटाळा असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रकाशित केले. त्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी कंत्राटांमधील आणखी तपशील स्पष्ट केला.
महाराष्ट्रात पंप बिघडल्यास तो त्वरित दुरुस्ती करणे व त्याची देखभाल करणे, हे काम योग्य रीतीने होईल आणि ते केले तरच उर्वरित रक्कम कंपनीला दिली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हे गुजरातमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरात सरकारचा कारभार
गुजरातमध्ये ब्राइट सोलार कंपनीला काम देण्यात आले आहे, पण या कंपनीला निविदा देऊनही काम न केल्याबद्दल उत्तर प्रदेशमधील यूपीनेडा कंपनीने त्यांची अनामत रकमेची बँक हमी जप्त करून काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे गुजरातमध्येही कसा कारभार सुरू आहे, हे दिसून येत आहे. मात्र गुजरातमध्ये अनेक कंपन्यांना कामे दिली असून उत्तर प्रदेशात एखाद्या कामासाठी एका कंपनीला नोटीस दिल्याने गुजरातमधील सौरपंप निकृष्ट दर्जाचे होतात का, असे विचारता ऊर्जा विभागातील उच्चपदस्थांनी मौन पाळले.