तालुक्याच्या पश्चिम भागात दहशत

संजय वाघमारे, लोकसत्ता

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

पारनेर : तालुक्याच्या पश्चिम भागात म्हस्केवाडी (अळकुटी) शिवारात दुर्मीळ पट्टेरी वाघ आढळल्याने परिसरात दहशत पसरली आहे. म्हस्केवाडी येथील दोन तरुणांना १७ जुलै रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अळकुटी-म्हस्केवाडी रस्त्यावर हा पट्टेरी वाघ दिसला.या तरुणांनी या वाघाची ध्वनीचित्रफीत तयार केली. दरम्यान हा पट्टेरी वाघ भीमाशंकर (जुन्नर) परिसरातील जंगलातून आला असावा, अशी शक्यता वन्यजीव अभ्यासक विनोद बारटक्के (पुणे) यांनी वर्तवली आहे.

म्हस्केवाडी येथील कुणाल म्हस्के व धनंजय खामकर हे दोन तरुण १७ जुलै रोजी पहाटे अळकुटी येथून मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून घराकडे परतत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कांदा साठवणुकीच्या दगडी चाळीवर (आरण) वाघ आढळला. त्यांनी गाडी मागे घेतली. गाडी मागे घेताना झालेल्या आवाजाने वाघ सावध झाला. तो रस्त्यावर आला.त्या वेळी तरुणांनी पट्टेरी वाघाची ध्वनिचित्रफीत तयार केली.

म्हस्केवाडीचे सरपंच किरण पानमंद, औषधे व्यावसायिक विठ्ठल पानमंद, वाहन चालक संतोष खामकर, संदीप चौघुले आदींना गेल्या पंधरा दिवसांत पट्टेरी वाघाने दर्शन दिले आहे. मात्र या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने नेमका वाघ आहे की बिबटय़ा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कुणाल व धनंजय या तरुणांनी पट्टेरी वाघ ध्वनिचित्रफितीत कैद केल्याने म्हस्केवाडी, चोंभूत परिसरात पट्टेरी वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वन्यजीव अभ्यासक विनोद बारटक्के यांच्या मते, वाघाची पिले साधारण दोन ते वर्षांची झाल्यावर पिलांचा सांभाळ करणे नर व मादी वाघ थांबवतात. त्यानंतर या वाघांना ज्या परिसरात दुसऱ्या वाघाचा अधिवास नाही असा स्वत:चा प्रदेश शोधावा लागतो. अशाच प्रदेशाच्या शोधात दोन ते चार वर्षे वयाचा वाघ भीमाशंकर परिसरातून म्हस्केवाडी परिसरात आला असावा.

म्हस्केवाडीपासून भीमाशंकरचे जंगल सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. एवढे अंतर वाघ एका रात्रीत पार करू शकतो. स्वत:च्या परिसराच्या शोधात हा वाघ आलेला असावा अशी शक्यता बारटक्के यांनी वर्तवली आहे. आपला प्रदेश निश्चित केल्यानंतर नर जातीचा वाघ सुमारे पन्नास वर्ग किलोमीटर परिसरात दुसऱ्या नर वाघाला प्रवेश करू देत नाही. मादी वाघ सुमारे तीस ते चाळीस वर्ग किलोमीटर परिसरात दुसऱ्या वाघिणीला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे एकदा वाघाने स्वत:चा प्रदेश निश्चित केल्यानंतर त्या परिसरात वाघांची संख्या वाढत नाही. अशी माहिती बारटक्के यांनी दिली. वन्यजीवप्रेमी राजेश परदेशी, शिवप्रसाद भांगरे, रावसाहेब कासार, दिनेश कलोसीया यांनी म्हस्केवाडी येथे भेट देऊन माहिती घेतली.

म्हस्केवाडी येथे पट्टेरी वाघ आढळल्याची चर्चा सुरू झाल्याने त्या परिसराला भेट दिली. आढळलेला प्राणी वाघ आहे किंवा बिबटय़ा आहे. हे लगेचच सांगता येणार नाही. पावसामुळे परिसरात आढळलेल्या प्राण्याचे पावलांचे ठसे शोधता आले नाहीत. या परिसरातील वनरक्षकांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. पावलांचे ठसे मिळाले तर त्या खुणा जतन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरात ट्रॅकिंग कॅमेरे बसवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. बुधवारी (दि. २१) संध्याकाळी कॅमेरे लावण्यात येतील. नागरिकांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी.

 – सीमा गोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारनेर.