रत्नागिरी : राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकृत शिक्षकाऐवजी तोतया शिक्षकांनी शिकवण्याचे प्रकार रोखण्यासाठी नियुक्त शिक्षकाचे छायाचित्र प्रत्येक वर्गात लावण्याची नामी शक्कल शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लढवली आहे. मात्र, या प्रयोगातून खरोखरीच तोतयागिरी रोखली जाईल का, हा खरा प्रश्न आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त, अशैक्षणिक कामेसुद्धा मोठय़ा प्रमाणात लादली जातात, हे वास्तव आहे. पण त्याचबरोबर या शाळांमधील काही शिक्षकांबाबत कामचुकारपणाच्याही तक्रारी वारंवार येत असतात. यापैकी काही शिक्षकांची तर आपल्याऐवजी दुसरीच व्यक्ती संबंधित शाळेमध्ये अध्यापनासाठी बेकायदेशीरपणे नेमण्यापर्यंत मजल गेली असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले. या तोतयेगिरीला आळा घालण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने ही उपाययोजना केली आहे.

या संदर्भात पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार  आपले गुरुजी या नावाने ए फोर आकाराचे छायाचित्र शाळेतील संबंधित वर्गामध्ये लावणे बंधनकारक असून तशी कार्यवाही झाल्याची खातरजमा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना समक्ष भेट देऊन करणे अपेक्षित आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल शिक्षण खात्याला सादर करावयाचा आहे.

शिक्षकांचा आक्षेप

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने या कृतीला जोरदार आक्षेप घेतला आहे. येथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणी तोतया शिक्षक ठेवले असतील तर संबंधित शिक्षकांना कायमचे घरी पाठवले पाहिजे. पगार पत्रकावरील शिक्षक आणि तोतया शिक्षक अशा दोघांवरही फसवणुकीसह अपहाराचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. पण राज्यात इतके गंभीर चित्र असेल तर आतापर्यंत कारवाई का नाही झाली, त्या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा नेमके काय करते सगळय़ाच शिक्षकांना अशा प्रकारे  बदनाम करणे योग्य नाही . या शासन निर्णयाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा तीव्र विरोध आहे.

शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्यासाठी सक्ती करू नये आणि त्यांना वेठीस धरण्यात येऊ नये, अशी मागणी करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, यापेक्षा जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे.

 एका शिक्षकाकडे दोन ते तीन वर्गाची जबाबदारी दिली जाते. काही ठिकाणी इयत्ता १ ली ते ५ वीच्या शाळेचा मुख्याध्यापकाला पूर्ण शाळेचा पदभार सांभाळावा लागतो. सततची प्रशिक्षणे व अशैक्षणिक कामे यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. राज्यभरात १८ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अध्यापनाबरोबरच प्रभारी म्हणून जबाबदारी आणि कागदपत्रांच्या बजबजपुरीमुळे मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहणारे अनेक ज्येष्ठ शिक्षक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

 वर्षांनुवर्षे शिक्षकांची पदे रिक्त ठेवली जातात. अनावश्यक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आणि त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता घसरली म्हणून पुन्हा शिक्षकांच्या नावाने ओरड करण्यात येते, हे अतिशय चुकीचे आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, विजयकुमार पंडित, सुजित साळवी, प्रभाकर खानविलकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले.