BLOG: तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य…

असे अधिकारी दीर्घ काळ राहिले तरच त्या भागाच्या विकासाला चालना मिळू शकते.

Tukaram mundhe
Tukaram Mundhe: जालना, सोलापूर आता नवी मुंबई येथे मुंढेंच्या समर्थनात व विरोधातही सर्वसामान्यांचे मोर्चे निघाले. काहींचा सूर हा मुंढे हे विकासदूत आहेत असा होता तर काहींचा सूर हा मुंढे हे 'एकाधिकारशाही' करतात असा होता.

रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥
तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥
तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । करावा परमार्थ अहर्निशी ॥

संत तुकाराम म्हणतात ज्याच्या अंगी राग आहे, असे लोक या जगात वाया गेले आहेत. तम म्हणजे अंधार, नरकच तो. अहंकार हा मायाजाळ आहे. सत्वाचे सामर्थ्य असतानाही त्याच्यातील रजतम हे त्यांच्या गुणांना मारक असल्याचे ठरते. त्यामुळे सत्वाचे सामर्थ्य ओळखून परमार्थ करावे. सध्या नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी संघर्षाला तो अचूक लागू होतो.

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अखेर अविश्वास ठराव मंजूर झाला. आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. कारण हा मंजूर प्रस्ताव आता नगरविकास विभागाकडे म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. तिथे निकाल लागेल तो लागेल. परंतु मुंढेंना एक क्षणही महापालिकेत येऊ द्यायचे नाही असा निश्चय येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला दिसतो. नवी मुंबईकरांना हा प्रकार नवा असला तरी मुंढेंना हे नित्याचेच झाले आहे. मागील १० वर्षांत (इतकंच काय परिक्षाविधीन कालावधीतही) त्यांना हा टोकाचा विरोध सहन करावा लागला आहे. मुंढे यांची १० वर्षांत तब्बल ८ वेळा बदली करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे ३ वर्षांपर्यंत एका ठिकाणी अधिकारी राहू शकतो. गेल्या काही वर्षांपासून (काही अपवाद वगळता) कोणाच्याच बाबतीत असं होताना दिसत नाही. पण मुंढे हे मागील १० वर्षांत सरासरी फक्त १.२५ वर्ष (म्हणजे ४५६ दिवस) एका ठिकाणी राहिलेत. प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी व काही अंशी नागरिकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले. मुंढे जिथे जिथे गेले तिथे त्यांनी सुस्त अधिकाऱ्यांना अक्षरश: कामाला जुंपले, वर्षोनुवर्षे रखडलेली कामे मार्गी लावली, भ्रष्टाचार बाहेर काढला, अधिकाऱ्याने काम कसं करायला हवं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. पण ! हा ‘पण’च कदाचित त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा अडसर ठरतोय. नियमावर बोट ठेऊन चालताना प्रत्येकाला एकाच तराजूत मोजणे हे योग्य आहे काय हे त्यांनी ठरवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याच बाबतीत असं का घडतंय याचे त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जनतेच्या हितासाठी लोकप्रतिनिधींचाही मुलाहिजा न ठेवणारे तुकाराम मुंढे हे काय पहिलेच अधिकारी नाहीत. परंतु मुंढे यांचे आतापर्यंत कोणाशीच जमल्याचे दिसत नाही. मुंढे हे उद्दामपणे वागत असल्याचा त्यांच्यावर नेहमी आरोप होतो. यात सर्वसामान्य नागरिकही आले. त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलेला एखाद्या नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी. त्याची तक्रार कितीही योग्य असली तर कायद्यात ती बसत नाही असं म्हणत अनेकांचा अपमान केल्याच्या तक्रारीही यापूर्वी आलेल्या आहेत. सर्वच तक्रारी खऱ्या नसतीलही परंतु काहींमध्ये तथ्य असण्याचीही शक्यता आहे. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक नागरिक किंवा लोकप्रतिनिधी हा कायदेपंडित नसतो हे त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. अनेकांना नियम माहित नसतात.

सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी तर जाहीर सभांमधून मुंढेंना शिवीगाळ केली होती. त्यावेळी संपूर्ण जनता त्यांच्या मागे उभी राहिली. इतकंच काय सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जेव्हा त्यांचा संघर्ष झाला. त्यावेळी मुंढेंच्या समर्थनात मोर्चे निघाले. त्यांची बदली होऊ नये म्हणून काही सामाजिक संस्था न्यायालयात गेल्या. जालनामध्ये असतानाही असेच झाले होते.
दुसरीकडे बार्शी येथील सत्तरीच्या घरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी एका वित्तीय संस्थेत गुंतवली होती. दुर्दैवाने ती संस्था बुडाली. याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना किमान सौजन्याची वागणूकही न देता त्यांचे म्हणणे ही ऐकून न घेता त्यांनाच उपदेशाचे धडे देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार या ज्येष्ठ नागरिकांनी केली. त्यांची कोणीच दखल घेतली नाही. ही दोन्ही उदाहरणे विरूद्ध टोकाची आहेत.
जालना, सोलापूर आता नवी मुंबई येथे मुंढेंच्या समर्थनात व विरोधातही सर्वसामान्यांचे मोर्चे निघाले. काहींचा सूर हा मुंढे हे ‘विकासदूत’ आहेत असा होता तर काहींचा सूर हा मुंढे हे ‘एकाधिकारशाही’ करतात असा होता. लोकप्रतिनिधींना न जुमानता केलेल्या त्यांच्या कामांना नागरिकांनी दाद दिली. परंतु जिथे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या स्वभावाचा फटका बसला त्यांनीही कडाडून विरोध केला. कामातील आक्रमकपणा न सोडता आपल्या स्वभावात थोडासा जरी बदल करता आला तर कदाचित चित्र वेगळेही दिसेल. माध्यमांशी बोलताना त्यांनी आत्मपरीक्षण करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्या आत्मपरीक्षणात त्यांना आपल्या काही उणिवा आढळून आल्या तर निश्चितच ते बदल करतील अशी आशा आहे. कारण असे अधिकारी जर एका ठिकाणी दीर्घ काळ राहिले तरच त्या भागाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
-दिग्विजय जिरगे
digvijay.jirage@indianexpress.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog on navi mumbai municipal corporation commissioner tukaram mundhe

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या