देशातील आठ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’नं गौरविण्यात आलं आहे. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन या किनाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, दुर्दैवानं यात महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नाही. याबद्दल युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षाही व्यक्त केली आहे.

देशभरातील आठ समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा ‘ब्लू फ्लॅग’ देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

यात महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नसल्याबद्दल सत्यजित तांबे यांनी खंत व्यक्त केली आहे.”दुर्दैवानं आपल्या राज्यात फ्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठ नाहीये. जर आवडीनं त्याचा विकास केला गेला, तर महाराष्ट्राच्या ७५० किमी लांबीच्या किनारपट्टीवर पर्यटन व रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. मला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मोठ्या आशा आहेत,” अशी अपेक्षा सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- देशातील ८ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’; पंतप्रधान मोदीनींही केलं कौतुक

भारतातील ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना मिळाला ब्लू फ्लॅग

शिवराजपूर बीच ( गुजरात), गोल्डन बीच( ओडिसा), घोघाला बीच ( दीव), पादुबिदरी बीच आणि कासरकोड बीच( कर्नाटक), कप्पड बीच( केरळ), रुशिकोंडा बीच( आंध्र प्रदेश) आणि राधानगर बीच ( अंदमान आणि निकोबार).