Sanjay Dina Patil on Shivsena Uddhav thackeray : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन इतर पाच बंडखोर खासदारांबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, हे पक्षांतर होताच आता आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांच्या काळात मनसे-सेना यांच्या युतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने कशा पद्धतीने राजुल पाटील यांना उमेदवारी दिली, याची माहिती संजय दिना पाटील यांनी दिली. ते काल (२२ जून) माध्यमांशी बोलत होते.
जानेवारी महिन्यात झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने एकत्र येत निवडणूक लढवली होती. यावेळी जागावाटपावरूनही प्रचंड गदारोळ झाला होता. मनसेला कमी जागा मिळून ठाकरेंनी सर्वाधिक जागांवर दावा केला. दरम्यान, भांडूपमधील प्रभाग क्रमांक ११४ मध्येही जागावाटपावरून मतभेद झाले होते. या जागेवर मनसेनेही दावा केला. पण खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली
याबाबत संजय दिना पाटील म्हणाले, माझ्या मुलीसाठी ती जागा मागितली नव्हती. पण मनसेला ती जागा जाऊ नये म्हणून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली. राजुल पाटील यांना लढायची इच्छा नव्हती, कारण त्या माझ्या मतदारसंघाचं काम पाहत होत्या. मनसेच्या अनिषा ताईंना जागा मिळणार होती. राजुलताईंना लढायचं नव्हतं. ती जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा शिवसेनेकडे राहिली पाहिजे, म्हणून राजुल पाटील यांना संधी देण्यात आली. खासदाराच्या मुलीला जागा मिळाली पाहिजे असं सांगून ती जागा देण्यात आली.”
पक्षाचा मालक बदलला आहे ना
“एका व्यक्तीने माझ्या विरोधात भूमिका घेतली. त्यांना कुणीही समजवू शकलं नाही. पक्षाचे मालक बदलून गेले आहेत ना? सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात सगळ्यांना कळलंच आहे ना. संजय राऊत यांच्याबाबत मी काहीही म्हणत नाही. मला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मान सन्मान दिला आहे”, असंही संजय दिना पाटील यांनी म्हटलं आहे. “तो एक व्यक्ती आम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब करत होता. त्यांच्या इथे आम्ही जाऊ शकत नाही. शाखा प्रमुखही आम्हाला कार्यक्रमांना बोलवत नाही, माझा फोटो लावायचा नाही असंही सांगण्यात आलं होतं”, असं म्हणत संजय दिना पाटील यांनी खंत बोलून दाखवली.
