सांगली : आई संसारात ज्याप्रमाणे नियोजनबध्द वागत असते आणि संसार अधिकाधिक चांगला होईल याची दक्षता घेते त्याचप्रमाणे आपण यशासाठीही काटेकोर नियोजन केले तर यश तर मिळतेच, पण त्याचबरोबर अवर्णनीय मानसिक आनंदही लाभतो, असे मत शरीरसौष्ठव स्पर्धेत विश्व चॅम्पियन किताब प्राप्त खेळाडू संग्राम चौगुले यांनी व्यक्त केले.

क्रीडा क्षेत्रामध्ये गेले एक शतक कार्यरत असलेल्या अंबाबाई तालीम संस्थेच्यावतीने चौगुले यांना संस्थेचे अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संजय भोकरे यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख पुरस्कार आणि आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी बोलताना चौगुले म्हणाले, नियोजन करून जर प्रयत्न केले तर यश मिळतेच पण हल्लीच्या तरुणाईकडे नियोजन असले तरी सातत्याचा अभाव दिसतो. याचा परिणाम सफलतेवर होतो. मात्र या अपयशालाच एक अभ्यास म्हणून पाहिले तर कोणतीही स्पर्धा कठीण वाटत नाही. आई ज्याप्रमाणे संसार नेटका करण्यासाठी प्रयत्नशील असते, त्याच पध्दतीने आपणही एखाद्या स्पर्धेकडे पाहिले पाहिजे. घरातील सर्व लोकांचा स्वभाव पाहून आई सर्वाना रूचेल, पटेल अशा पध्दतीने निर्णय घेत असताना स्वमताचाही आदर करीत असते. हाच आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे.

या वेळी बोलताना भोकरे यांनी तरुणांमध्ये व्यायाम आणि शारीरिक विकासासाठी खुली व्यायाम शाळा उभारण्याचा संकल्प असल्याचे सांगून चौगुले यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने पाच वेळा महाराष्ट्र श्री, सहा वेळा भारत श्री, दोन वेळा एशिया श्री आणि मिस्टर युनिव्हर्स असे किताब मिळविले आहेत. तोच आदर्श तरुणांनी घ्यावा हा उद्देश हा कार्यक्रम आयोजनामागे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रा. भिडंगडे यांनी स्वागत तर प्रशासकीय संचालक पराग इनामदार यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ भोकरे, संचालक डॉ. ए.सी. भगली, पदविका अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य सी.पी. दिवटे, औषधशास्त्र  पदविका विभागाचे प्राचार्य डॉ. संदीप शेळके, डीटीएड प्राचार्य जे. एस. पाटील यांचेसह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.