सोलापूर : शहरातील मोरे हिंदू स्मशानभूमीत दफन केलेला एका दहा महिन्यांच्या मुलाचा मृतदेह तिसऱ्याच दिवशी गायब झाल्यामुळे मृत बाळाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत थेट पोलिसांत धाव घेतली. कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी जादूटोण्यासाठी बाळाचा मृतदेह जमिनीतून उकरून नेला असावा, असा संशय व्यक्त होत असून पोलीस विविध पैलूंनी तपास करीत आहेत.

विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २ मध्ये राहणारे राहुल वाघमारे यांचा अवघ्या दहा महिन्यांचा मुलगा प्रियांस यास घरात अचानकपणे झटके आल्यामुळे एका खासगी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूला सूज आल्यामुळे उपचाराच्यावेळी गेल्या १४ जून रोजी बाळाचा मृत्यू झाला. त्याच दिवशी दुपारी मृत बाळाचा मृतदेह मोरे हिंदू स्मशानभूमीत पुरण्यात आला होता. त्यासाठी चार फूट खोल खड्डा खणण्यात आला होता. थडग्यावर मोठी फरशी ठेवण्यात आली होती. रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी उरकण्यासाठी बाळाचे नातेवाईक स्मशानभूमीत आले असता तेथे बाळाच्या थडग्यात मोठा खड्डा पडल्याचे आणि थडग्यातील बाळाचा मृतदेह गायब झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप; आयोगाने सविस्तर निवेदन करावे, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी, रवींद्र वायकरांच्या विजयाबद्दल शंका

हेही वाचा – “महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कोकणाने…”

पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेऊन श्वानपथकाच्या मदतीने तपास केला. परंतु त्यातून हाती काही लागले नाही. मृतदेह जनावरांनी पळवून नेला असावा, असा कयासही व्यक्त होत आहे. मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार थडग्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बाळाचा मृतदेह दफन केला होता. थडगा उघडा पडल्यानंतर तेथे जवळच मृत बाळाच्या मृतदेहावर घातलेले कापड आढळून आले. आसपासच्या संपूर्ण परिसरात शोध घेतला असता मृतदेह किंवा त्याच्या शरीराचे कोणतेही आवशेष सापडले नाहीत. स्मशानभूमीत सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था नाही. सोलापूर महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आपल्या चिमुकल्या लाडक्या बाळाचा पुरलेला मृतदेह गायब झाल्याचा आरोप बाळाचे वडील राहुल वाघमारे व आई मृणाली वाघमारे यांनी केला आहे.