रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे शनिवारपासून भारत श्री या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पध्रेत देशभरातील नामवंत पुरुष व महिला शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत. कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेल्या या शहरात होणाऱ्या या कोकणातील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पध्रेची तयारी पुर्ण झाली आहे. आयोजकांनी भारतश्रीचा आस्वाद प्रेक्षकांना मनमुराद लुटता यावा म्हणून १५ हजार क्षमतेचे भव्यदिव्य स्टेडियम उभारले आहे.

देशभरातील ५०० खेळाडू यात सहभागी होणार असून जवळपास ३७ लाखांची रोख पारितोषिक या वेळी वितरित केली जाणार आहे. पुरुषांबरोबर महिला शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग सर्वासाठी कुतूहलाचा विषय ठरणार आहे. या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंच्या आहाराची विशेष सोय करण्यात आली आहे. खेळाडूंच्या आहारासाठी ८० हजार अंडी आणि ५ हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंच्या तीन दिवसांचा सकस आहार असून ५०० किलो सफरचंद आणि मोसंबी तसेच केळींचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजक अनिकेत तटकरे यांनी दिली.

स्पध्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नामांकित शरीरसौष्ठवपटू रोह्य़ात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या निवासाची आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्पध्रेदरम्यान महिला शरीरसौष्ठवपटूंना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

पीळदार शरीरयष्टीची क्रेझ सध्या जगभरात पसरली आहे. व्यायामशाळांमध्ये तासन्तास मेहनत करून, प्रथिनयुक्त आहार घेऊन देशभरातील तरुण आकर्षक आणि पीळदार शरीरयष्टी कमवण्याच्या मागे लागले असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या मेहनतीला व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील लोकांनाही व्यायामाचे महत्त्व कळावे, सुदृढ शरीरासाठी चांगल्या व्यायामाची आवड निर्माण व्हावी हा या स्पध्रेमागचा मूळ उद्देश असल्याचे आयोजक अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केले.