मुंबई : राज्यभरातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पुढील महिन्यात राज्यव्यापी शोध मोहीम राबविली जाईल. बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी कायदेशीर तरतुदी केल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. बोगस डॉक्टरांबाबत जिल्हा, महानगरपालिका व तालुका स्तरावर समित्यांमार्फत सातत्याने आढावा घेतला जात आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुढील महिन्यात राज्यव्यापी शोध मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अबिटकर यांनी दिली.

वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी पदवी मिळाल्यानंतर संबंधित कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून या नोंदणी प्रक्रियेचे आणि नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. वैद्यकीय उपचारांदरम्यान डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखालील मेडिकल निग्लिजन्स समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत अशा घटनेची चौकशी करून अहवालानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे, असेही अबिटकर म्हणाले.  

ग्रामीण व आदिवासी भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अशा भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी प्रोत्साहनपर भत्ते वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची उपलब्धता व्यवस्थित आहे, त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.