अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लालसेने आपल्या आयुष्यभराची कमाई घालवून पस्तावत बसणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ होत असल्याचेच दिसून येते. बोगस फायनान्स कंपन्यांच्या भूलथापा, वातानुकूलित सुसज्ज कार्यालये, महागडय़ा गाडय़ा, हॉटेलांमधून दिल्या जाणाऱ्या जंगी पाटर्य़ा आदींना बळी पडणाऱ्या सामान्यांसह समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठितांना अशा फसव्या कंपन्यांच्या मायाजालात अडकण्यापूर्वी वाचविण्यासाठी आता पोलीस यंत्रणेनेच पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी चर्चा सुरू असल्याचे ऐकू येते.
वर्ष-दोन वर्षांच्या अल्प मुदतीत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट मिळण्याचे आमिष दाखवून सामान्यांबरोबरच डॉक्टर, वकील, राजकीय पुढारी आदी समाजातील प्रतिष्ठितांना ठकविणाऱ्या अनेक फायनान्स कंपन्या गेल्या काही वर्षांपासून देशभरात कार्यरत आहेत. लहान-मोठय़ा शहरांत वातानुकूलित सुसज्ज ‘कार्यालय-कम-दुकान’ थाटून त्यांचा कारभार बिनबोभाट सुरू असतो. सुशिक्षित बेरोजगारांना मोठय़ा पगारासह आकर्षक कमिशन देऊन त्यांच्या माध्यमातून या कंपन्या आपली योजना लोकांपर्यंत पोहोचवितात. तर त्याच वेळी समाजाच्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठितांना हेरून मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये जंगी पाटर्य़ाचे आयोजन करून त्यांना प्रभावित केले जाते. त्यांच्या त्या भूलथापा आणि थाटामाटाला बळी पडून ही मंडळी आपली आयुष्यभराची कमाई, मागचा पुढचा कसलाही विचार न करता कंपनीकडे गुंतवतात.
दरम्यान आपल्या कंपनीवर विश्वास बसावा म्हणून गुंतवणूक केलेल्या काही प्रतिष्ठितांना अवघ्या सहा-सात महिन्यांच्या अल्पावधीत गुंतविलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम किंवा एखादी मौल्यवान वस्तू ‘गिफ्ट’ देऊन त्यांचा विश्वास संपादन केला जातो. परिणामी गुंतवणूकदारांची संख्या वाढते आणि अचानक ती कंपनी आपला गाशा गुंडाळून निघून गेल्याचे वृत्त पसरते. वातानुकूलित सुसज्ज कार्यालयाला भले-मोठे कुलूप लावल्याचे दिसून येते. त्या वेळी ‘आपण फसलो’, असे स्वत:शीच पुटपुटत गुंतवणूकदार तेथून काढता पाय घेतो. समाजात आपले हसे होईल, आपली इज्जत जाईल, या भीतीने ते गप्प बसतात. पोलिसांकडे तक्रार करण्याचे धाडसही ही मंडळी करीत नाही.
रत्नागिरी जिल्ह्य़ात गेल्या वीस-पंचवीस वर्षांत फसवेगिरी करणाऱ्या अनेक फायनान्स कंपन्या आल्या व हजारो लोकांना लाखो-करोडो रुपयांचा गंडा घालून निघून गेल्या. एकदा या कंपन्यांच्या बोगस योजनांना बळी पडलेली व्यक्ती पुन्हा या फंद्यात पडणार नाही, असे वाटत असले तरी अल्पावधीत श्रीमंत होऊ पाहणारे मात्र पुन:पुन्हा अशा कंपन्यांच्या मायाजालात अडकत असल्याचेच दिसून येते. गुहागर येथील ‘शाईन’ नामक कंपनीने ४ कोटींचा गंडा घातल्याचे पोलिसांनीच उघडकीस आणल्याचे उदाहरण ताजे असतानाच गेल्याच महिन्यात रत्नागिरी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या व दिल्लीपासून रत्नागिरीपर्यंतच्या हजारो लोकांना तब्बल ११०० कोटींचा चुना लावणाऱ्या ‘स्टॉक गुरू’ कंपनीच्या उल्हास खैरे ऊर्फ सिद्धार्थ मराठे व त्याची पत्नी माया मराठे यांना दिल्ली क्राइम ब्रँच पोलिसांनी अटक केली. या खैरे ऊर्फ मराठे दाम्पत्याकडे आलिशान बंगले, गाडय़ा, फ्लॅट्स, मौल्यवान वस्तू आढळून आल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
याव्यतिरिक्त निसर्ग फॉरेस्ट, कल्पवृक्ष मार्केटिंग, पल्स ग्रीन फॉरेस्ट, संचयनी सेव्हिंग्ज अॅण्ड इन्व्हेस्टमेंट इंडिया, राजमुद्रा अॅग्रोटेक इंडिया, हरितकांचन फॉरेस्ट इंडिया, शारियाह इस्लामिक फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी, गोवा अॅग्रो अॅण्ड मिल्क, इंडिया इन्फोलाईन, सार्थ अॅण्ड ड्रील आदी कंपन्यांनी जिल्ह्य़ातील हजारो लोकांना आपल्या मायाजालात अडकवून लाखो-करोडो रुपयांची फसवणूक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या फायनान्स कंपन्या रिझव्र्ह बँकेच्या नियमानुसार तसेच सरकारी कायद्यानुसार नोंदणीकृत आहेत किंवा नाही, याची खातरजमा करून घेण्यासाठी आता पोलीस यंत्रणेनेच पुढाकार घेण्याची गरज आहे. या कंपन्यांशी संबंधित व्यक्तीची ओळखपत्रे, नोंदणी प्रमाणपत्रे काटेकोरपणे तपासली गेली पाहिजेत. तसेच अशा कंपन्यांना कार्यालयासाठी जागा भाडय़ाने देण्यापूर्वी जागामालकांनी पोलिसांनी दिलेला ‘ना हरकत दाखला’ मागून घ्यावा, हॉटेलांमधून दिल्या जाणाऱ्या जंगी पाटर्य़ा किंवा मीटिंगबाबतची पूर्वकल्पना संबंधित हॉटेलमालक/व्यवस्थापकांनी द्यावी, अशा सक्त सूचना पोलीस यंत्रणेने द्यावी आणि अशा कंपन्यांच्या मायाजालात अडकण्यापासून जनतेला वाचवावे.
रत्नागिरीत बोगस फायनान्स कंपन्यांचे मायाजाल
अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लालसेने आपल्या आयुष्यभराची कमाई घालवून पस्तावत बसणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ होत असल्याचेच दिसून येते.
आणखी वाचा
First published on: 11-12-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus finance company phantasmagoria in ratnagiri