बोईसर शहराला दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचा विळखा
बोईसर : एकीकडे पाण्याचा तुटवडा भासत असतानाच बोईसर परिसरातील वसाहतींना दूषित पाणी येऊ लागले आहे. यामुळे साथीचे आजार बळावले आहे. गॅस्ट्रो, टायफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून एप्रिलमध्ये ३८ रुग्ण आढळले होते.
बोईसर येथील दांडीपाडा, सुतारपाडा, धनानी नगर व गणेश नगर याठिकाणी चाळींमध्ये कामगार राहत आहेत. प्रत्येक चाळ मालकाने आपल्या घरासमोर कुपनलिका केल्या असुन त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. त्याला लागुनच असलेली शौचालये व सांडपाण्याचे नाले यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मोठय़ा प्रमाणात दुषित झाले आहेत. यामुळे गँस्ट्रो, टायफॉईड व कावीळ सारखे साथीचे आजार वाढले आहेत.
बोईसर ग्रामीण रूग्णालयात एप्रिल महिन्यात गँस्ट्रो व टायफाईडचे ३८ रूग्ण आढळून आले होते. बोईसर येथील अनेक खासगी रूग्णालयात रूग्ण आपला उपचार करून घेत आहेत. रस्त्यावर असलेल्या हातगाडय़ा व हाँटेल मधील दुषित पाणी यामुळे देखील गँस्ट्रो सारखे आजार होऊ शकता अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय ह्यंच्या अंतर्गत येणारम्य़ा गावांमध्ये असलेले कुपनलिका, विहरी, नळयोजना येथील पाण्याचे नमुने आरोग्य विभागा कडुन प्रत्येक तिन महिन्यात तपासले जातात. पाण्याचे
स्रोत दुषित असल्यावर त्याठिकाणचे पाणी पिण्यासाठी मनाई केली जाते असे असले तरी याची सर्वच ठिकाणी नियमित तपासणी केली जात नसल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. त्यातच कुपनलिका, विहिरी व नळयोजना येथील पाणी जरी तपासणी करत असले तरी या पाण्याच्या स्त्रोताजवळ असलेल्या घाणीमुळे व गटाराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही, या कडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
आरोग्य केंद्राकडुन पाण्याची तपासणी प्रत्येक तीन महिन्यातून केली जाते. मात्र पाण्याच्या स्त्रोताजवळ गटार किंवा अस्वच्छता असेल तर मोठय़ा प्रमाणात साथीचे आजार व गँस्ट्रो आणि कावळी यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे नागरिकांनी व ग्रामपंचायतीने देखील याभागात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
-डॉ. मनोज शिंदे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, बोईसर