Bombay High Court FDA Hotel License: अस्वच्छतेच्या कारणावरून नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला. याविरोधात हॉटेलने न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला मिश्किल सवाल केला. “गेल्या आठवड्यात माझ्या टेबलावर मोठा किडा बसला होता, मग आता काय करायचं?”, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला विचारला.
एफडीएला न्यायालयाचा सवाल
नवी मुंबईतील ‘पार्क इन बाय रॅडिसन’ या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आल्याप्रकरणी एफडीएच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. “परवाना रद्द करण्यासाठी कोणते निकष वापरले जातात?”, अशी विचारणा खंडपीठाने अन्न व औषध प्रशासनाला केली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी विनोदी टिप्पणी केली.
न्यायालय काय म्हणाले?
“गेल्या आठवड्यात एक मोठा किडा माझ्या टेबलावर येऊन बसला होता. आता आपण काय करू शकतो? आपण भारतात राहतो. मी माशीबद्दल बोलत होतो ना? बघा, आता देखील इथे एक माशी फिरतेय. आपण भारतात आहोत, त्यामुळे आपल्याला व्यावहारिक आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
हॉटेल्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
“मुद्दा केवळ एक किंवा दहा झुरळांचा नाही. पण, एका चेकलिस्टच्या आधारे कठोर कारवाई करून थेट परवाना निलंबित केला जाऊ शकत नाही. एफडीएने एवढी मोठी कारवाई करण्यापूर्वी कोणतीही ठोस आणि लेखी कारणे दिली नव्हती”, असा युक्तिवाद हॉटेलची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. संबंधित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता होती आणि तिथं झुरळं फिरताना दिसली होती, अशी माहिती एफडीएने दिली आहे.
राज्यभरात एफडीएने धडक मोहीम
एफडीएने राज्यभरात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एफडीए नियमांच उल्लंघन केल्याचे आढळल्यास हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून पार्क इन हॉटेलवर करण्यात आली होती. एफडीएने मंगळवारी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब सह इतर तीन मोठ्या क्लबचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. एफडीएने आर. के. जुहू जिमखाना, अपरणा जुहू जिमखाना आणि वेलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचेही अन्न परवाने नियमभंगाच्या कारणावरून निलंबित केले आहेत.
