लग्नामध्ये ग्रह-तारे जुळले पाहिजेत, ३६ गुण जुळले पाहिजेत अशी अनेकांची श्रद्धा असते. त्यावरून आजही देशात लाखो लग्न जुळतात आणि मोडतात देखील. पण याच ग्रह-ताऱ्यांचा आधार घेऊन एका महाभागाने आपल्या प्रेयसीशी विवाह करण्यास नकार दिला. त्याउपर यावरून न्यायालयात खटला चालला असताना देखील त्यातून आपल्याला याच आधारावर मुक्त करण्यात यावं, अशी देखील मागणी त्यानं न्यायालयाकडे केली. यावर मुंबई उच्च न्यायालयातील एकसदस्यीय खंडपीठाने संबंधित आरोपीला चांगलंच धारेवर धरत त्याची याचिका फेटाळून लावली.

नेमकं काय आहे प्रकरण?

बदलापूरला राहणाऱ्या ३३ वर्षीय अविशेक मित्राचे पीडित तरुणीशी २०१२ पासून प्रेमाचे संबंध होते. लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तरुणीला शारिरीक संबंध ठेवण्यास देखील भाग पाडलं. मात्र, जेव्हा ही तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा मात्र त्यानं लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच तरुणीनं बोरिवली येथे पोलीसांकडे तक्रार दाखल केली. या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून हे दोघे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र काम करत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. तसेच, गर्भवती राहिल्यानंतर अविशेकनं तरुणीला गर्भपात करण्यासाठी देखील भाग पाडलं. तसेच, दोन वर्षांनंतर आपण लग्न करुयात, असं आश्वासन त्यानं दिलं.

२०१३मध्ये तत्कालीन सहायक पोलीस आयुक्तांनी या दोघांची समजूत काढल्यानंतर अविशेक लग्नासाठी तयार झाला. तरुणीनं तक्रार देखील मागे घेतली. पण दोनच दिवसांत त्यानं पोलिसांकडे आपण लग्नासाठी तयार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे लागलीच तरुणीने नवीन तक्रार दाखल केली. लग्नाच्या आमिषाखाली बलात्कार केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. याविरोधात अविशेकनं सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी याचिका फेटाळल्यानंतर त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही आता त्याची याचिका फेटाळली आहे.

काय आहे अविशेकचा दावा?

अविशेकनं न्यायालयात केलेल्या प्रतिवादानुसार, त्याला संबंधित तरुणीशी लग्न करायचंच होतं. सुरुवातीपासूनच तो या लग्नासाठी तयार होता. पण या दोघांचे ग्रह-तारे आणि पत्रिका जुळत नसल्यामुळेच त्याने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यामधून आपल्याला मुक्त करून पत्रिका जुळत नसल्यामुळे लग्नाचं आश्वासन पाळू शकत नसल्याचाच गुन्हा म्हणून त्याकडे पाहिलं जावं, असं अविशेकनं न्यायालयात सांगितलं.

न्यायालयानं फटकारलं!

दरम्यान, अविशेकचा प्रतिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. “पत्रिकांच्या नावाखाली याचिकाकर्त्यानं लग्नाचं आश्वासन मोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याने तक्रारदार तरुणीची फसवून सहमती घेतल्याचं आणि लग्नाचं खोटं आमिष दाखवल्याचं स्पष्ट होत आहे. हाती आलेल्या निष्कर्षांवरून याचिकाकर्त्याला सुरुवातीपासूनच तक्रारदार तरुणीशी लग्न करायचं नव्हतं, लग्नाचं त्याचं आश्वासन पाळायचं नव्हतं. खोटं आश्वासन देऊनच त्यानं तक्रारदार तरुणीला तक्रार मागे घेण्यास भाग पाडलं”, असं म्हणत न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली.