आज ग्रंथाली तर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर या निमित्ताने एकत्र आले होते. राज ठाकरेंनी जी टोलेबाजी केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरेंनाही त्यांनी आपल्या भाषणातून टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला

हास्यरेषा या अत्यंत सुंदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माझे सहकारी आशिष शेलार आणि बंधू भगिनींनो सर्वच लोक डाव्या बाजूला गेले म्हणून जाणीवपूर्वक उजवीकडे आलो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारी आणि त्यांच्या इतिहासाचं संकलन करणारा ग्रंथ प्रशांत कुलकर्णींनी उत्तमपणे संपादित केला. या प्रकाशनासाठी मला राज ठाकरेंचा फोन आला. मग प्रशांतजीही मला भेटले. मलादेखील अतिशय आनंद वाटला. मगाशी आशिषजी असं म्हणाले की राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्रजी येतात. आशिषजी, २०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा मी गेलो. २०१९ नंतर बोलवलंच नाही, नाहीतर गेलो असतो. मी वाटच पाहात राहिलो. कार्यक्रमात शेवटचं भाषण देण्याचा फायदा हा आहे की यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आजतरी मी काहीही बोललो तरी प्रति षटकार येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रशांत कुलकर्णी यांनी पुस्तकाचं उत्तम संकलन केलं आहे-फडणवीस

प्रशांत कुलकर्णींनी पुस्तकांचं उत्तम संकलन केलं आहे. जुनी व्यंगचित्रं, त्याचे संदर्भ, इतिहास, स्वगत सगळं आपण पाहतो तेव्हा हा विलक्षण प्रवास पाहण्यास मिळतो. १८८१ ते १९९७ पर्यंत विविध व्यंगचित्रकारांचं मनोगत आणि चरित्रं आणि त्यांची व्यंगचित्रं तुम्ही दिली आहेत. राज ठाकरे या ठिकाणी आहेत, पंडीत आहेत, निलेश खरे आहेत. ज्यांची व्यंगचित्रं पाहण्यास मिळतात. व्यंगचित्र ही अशी कला आहे ज्यातून एक शब्द न बोलता पाहिजे तेवढे फटकारे मारता येतात आणि जे सांगायचं आहे ते नेमकेपणाने सांगता येतं. परिस्थितीचं आकलन करण्यासाठी अग्रलेख लिहिता येतो तसंच काम व्यंगचित्र करतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. व्यंगचित्रकार हे काम त्या ठिकाणी करत असतात. एखादं व्यंगचित्र पाहिल्यावर जो आनंद आपल्याला मिळतो, आता तर आम्ही त्याचे विषय आहोत. प्रत्येक व्यक्तीला आपला फोटो सुंदर यावा असं वाटत असतं. पण अनेक कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर व्यंगचित्र मिळालं तर ते कसंही काढलेलं असलं तरीही ते चांगलंच वाटतं.

नेपोलियनचं व्यंगचित्र आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आठवण

मी एकदा राज ठाकरेंना विनंती केली होती की माझं व्यंगचित्र काढलंत तर नाक मोठं दाखवा, कान मोठे दाखवा पण पोट काही मोठं दाखवू नका. माझी विनंती राज ठाकरेंनी केली. पण बाकी लोक ऐकत नाहीत त्यांना माझं पोटच दिसतं. व्यंगचित्राची शक्ती किती आहे तर एका व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र काढलं ज्यात नेपोलियन आणि ब्रिटिश प्राइम मिनिस्टर बसलेत. मधे केक किंवा अॅपल पाय अशी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे ते तुकडे करत आहेत असं ते व्यंगचित्र होतं. त्यानंतर नेपोलियनने असं सांगितलं की युरोपची सेना माझं जेवढं नुकसान करू शकली नाही तेवढं नुकसान आणि बदनामी एका व्यंगचित्राने केली. ही व्यंगचित्राची ताकद आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण पाहिलं की कुठल्याही काळात ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात किंवा एखादी गोष्ट ज्याला विरोध अभिप्रेत असतो तो या व्यंगचित्रांमधून पाहायला मिळतो. आपल्या महाराष्ट्रात ही परंपरा सर्वाधिक जोपासली गेली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.