2015-02-21मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे वाळीत टाकलेल्या कुटुंबाच्या घरावर दगडफेक करून मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावकीच्या लोकांनी पीडित कुटुंबाकडून केलेले बांधकामही तोडून टाकले असल्याची तक्रार रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे.  मुरूड तालुक्यातील शिरगाव येथील कृष्णा जनार्दन सातमकर यांच्या कुटुंबाला गावकीने जागेच्या वादातून वाळीत टाकले आहे. यासंदर्भातील तक्रार दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे येताच जिल्हा प्रशासनातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण िशदे ,अपर पोलीस अधीक्षक राजा पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन हा वाद मिटवला होता.
मात्र प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी गावकीने हा वाद मिटला असल्याचा आभास निर्माण केला की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण महिन्याभरातच या वादाला पुन्हा तोंड फुटले असून सातमकर कुटुंबाला गावकीकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता कृष्णा सातमकर यांनी आपल्या घरासमोरील जागेत पिचिंगचे काम सुरू केल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला अटकाव केला. तसेच जे पिचिंगचे काम झाले होते, ते तोडून टाकले. या ग्रामस्थांनी आपल्या घरावर दगडफेक केली, तसेच या सर्व घटनेचे रेकॉर्डिग असलेला मोबाइल घरातून पळवून नेला अशी तक्रार कृष्णा सातमकर यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात केली आहे.
या प्रकरणी दिलीप दांडेकर, हिराजी ठाकूर, सहदेव सातमकर, विनायक ठाकूर, गणपत पाटील, संदीप सातमकर, सुधाकर सातमकर, प्रदीप पाटील, नरेश चवरकर, राजा चवरकर, किशोर काजारे, कविता सातमकर, कमलाबाई काजारे, हिराताई मोरे, सुरेखा सातमकर, चंद्रकला चवरकर, पूनम सातमकर यांच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ग्रामस्थांनीही या सातमकर कुटुंबाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंदराव मुळीक हे तपास करीत आहेत.