जिल्हा परिषदेतील ‘झेडपीआर’च्या समान निधी वाटपावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूआहे. सोमवारी हा संघर्ष चव्हाटय़ावर आला. समान निधी वाटपावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी गोंधळ घालत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिनसह सामान्य प्रशासन विभागात तोडफोड केली.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप हा विरोधी पक्ष आहे. झेडपीआरचा निधी सत्ताधाऱ्यांनी आपसात वाटून घेतल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वी अनेकदा केला. काही दिवसांपूर्वी स्थायी समिती बठकीत याच कारणावरून रणकंदन माजले होते. आमदार पंकजा पालवे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष देऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करीत समान निधीवाटप करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. झेडपीआरच्या समान निधी वाटपाच्या कारणावरून सुरू असलेला संघर्ष सोमवारी उफाळून आला. भाजपच्या काही सदस्यांनी आक्रमक होत जि. प. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करीत खुच्र्याची तोडफोड केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासह सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा विभाग येथे गोंधळ घातला. माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी माळी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन अनेकांना ताब्यात घेतले. जि.प.त झालेल्या राडा आंदोलनाने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. आंदोलनात भाजपचे सदस्य गंगाभीषण थावरे, दशरथ वनवे आदींचा सहभाग होता.