रत्नागिरी: मुंबईहून गणपतीपुळेकडे जात असताना  संगमेश्वर तालुक्यातील तुरळ  येथे भरधाव ब्रेझा कार वरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून चालक जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  या चारचाकी वाहनाचा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती कंपनीची  ब्रेझा (क्रमांक एमएच ०४ जेव्ही ७१९८) हे भरधाव वेगात मुंबई कडून गणपतीपुळे कडे जात होती. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेली साईड गार्ड तोडून रस्त्याबाहेर घसरत गेली. या अपघातात कारचा दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशाला प्राथमिक उपचारांसाठी तसेच अपघातात मृत चालकाला रुग्ण वाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मृत चालकाचे नाव वय अद्याप समजू शकले  नाही.

घटनास्थळीचा  पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.  अतिवेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.