मुंबई: ‘मंत्रालयातील माझ्या दालनात लाचखोरीचा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. हे कलंक लावणारे वर्तन असून लिपीक राजेंद्र ढेरिंगे याची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगताना मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचखोरीचा प्रकार घडल्यानंतर झिरवाळ यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत लाचखोरीच्या प्रकरणाबाबत खुलासा केला. लाचलुचपत विभागाला कारवाई करावी लागेल असा कोणताही प्रकार याआधी घडला नव्हता. अन्न व औषध प्रशासन विभागात नेहमीप्रमाणे सुनावणी घेणे, स्थगिती देणे, निलंबित करणे काही दिवसांत बाबींची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा परवानगी देणे ही दैनंदिन प्रक्रिया आहे.
कधीही कोणावर बळजबरी करण्यात आलेली नसल्यादा वा नरहरी झिरवाळ यांनी केला. त्याचप्रमाणे लाचखोरी प्रकरणात आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा कोणताही जबाब ढेरिंगे यांनी नोंदवलेला नाही. त्याने ही लाच स्वत:साठी घेतल्याचेही कबूल केले असल्याचे झिरवाळ म्हणाले. आपल्या कार्यालयात घडलेल्या घटनेबाबत आपण अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर ढेरिंगेवर पुढील कारवाई केली जाईल. ढेरिंगे याच्याशी कोणाचा संबंध आढळून आला तर त्यालाही याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.
या प्रकरणाची दखल घेत विभागातील अधिकाऱ्यांची मी बैठक घेणार आहे. यापुढे विभागाच्या कारभारावर माझी बारीक नजर असणार आहे. कुणी मुद्दामहून हे प्रकरण घडवून आणले असेल असे मला वाटत नाही. कारण मी कोणाचा स्पर्धक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही माझे काेणी वैरी नाहीत. सर्वच पक्षांसोबत मी काम केले आहे. त्यामुळे मी असे करणार नाही याची सगळयांना जाणीव आहे. कुणाला मंत्रीपदावर ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अद्यापपर्यंत बोलणे झालेे नाही, पण त्यांना कामासंदर्भात भेटणार असल्याचे झिरवाळ म्हणाले.

