रत्नागिरी – कोकणाच्या तीन जिल्ह्यांत असलेल्या साकवांची जागी लवकर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आता ग्रामपंचायत स्तरांवर आराखडा बनविण्याचे काम केले जात असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कोकणातील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येण्यासाठी जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीमार्फत चार महिन्यांपासून साकवांचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मंत्री कदम यांनी सांगितले.
ग्रामविकास खात्यामार्फत पूल बांधत असताना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायतीकडून साकवांची माहिती घेण्यात आली आहे. साकव आराखडा येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये तयार करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तो सादर करणार असल्याचे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले. कोकणात साकवांच्या जागी पूल बांधण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असून त्याला अंतिम मंजुरी दिल्यावर कोकणातील साकवांचा प्रश्न कायमचा मिटणार असून पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.