पोलिसांच्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद्यांची दहशत झुगारून बांधकाम

मंगेश राऊत, जारावंडी (गडचिरोली)

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्य़ातील विकास कामांना नक्षलवाद्यांनी नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे ग्रामीण भागात रस्ते व पुलांचे बांधकाम होऊ शकले नाही. महाराष्ट्रातील जारावंडी ते छत्तीसगडमधील पाखंजूर यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी १९ वर्षांपूर्वी तो पूल बॉम्बस्फोटाने उडवला होता. तेव्हापासून पुलाचे बांधकाम करण्यास कुणीही धजावत नव्हते. अखेर पुलाचे बांधकाम सुरू झाले असून ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या पुलामुळे दोन राज्यातील व्यापाराला चालना मिळणार असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्य़ातील कसनसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी, जांभिया-गट्टा या परिसरात नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून पोलिसांवर हल्ला केला. जारावंडी आणि कसनसूरपासून छत्तीसगडची सीमा ७ ते ८ किमी आहे.

जारावंडीपासून काही अंतरावर असलेल्या भापडा नदीवर पुलाला १९ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. बांधकामाला सुरुवात झाली. नदीवर पुलासाठी दोन ते तीन पिलर उभे करण्यात आले. मात्र नक्षलवाद्यांनी पुलाला विरोध करून तेथे स्फोट घडवला. त्यात काही पिलर जमिनदोस्त झाले तर खोदाकामासाठी वापरण्यात येणारे पोक्लेन मशीन जळून खाक झाले. तेव्हापासून पुलाचे बांधकाम बंद होते. इतक्या वर्षांनी पोलिसांच्या प्रयत्नानंतर त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू झाले. हे बांधकाम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती बांधकाम करणारी कंपनी एस.आर. कन्स्ट्रक्शनचे पर्यवेक्षक अनिक मंडल यांनी दिली.

दहा वर्षांत एकही पुढारी फिरकला नाही

कसनसूर हा परिसर संवेदनशील आहे. स्थानिक लोकांना विकास हवा आहे. पोलिसांना आवश्यक असलेला विकास परिसरात होतो. पण, नागरिकांना रस्ते, रोजगार, बाजारपेठ आदींची गरज असते. परिसरात मोठय़ा प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन होते. त्यासाठी बाजारपेठ आवश्यक आहे. पण, बाजारपेठेअभावी स्थानिक लोक मोहफुलापासून दारू तयार करून त्याची विक्री करतात. काहीजण पाखंजूर येथे वनोपज विकतात. त्याकरिता जारावंडीप्रमाणे कसनसूर परिसरातही नदीवर पूल बांधण्याला चालना मिळावी, अशी मागणी अनेकदा राजकीय पुढाऱ्यांकडे करण्यात आली. पण, गेल्या दहा वर्षांत एकही मोठा राजकीय पुढारी या परिसरात फिरकला नाही.

– बबिता मडावी, पंचायत समिती सभापती, कसनसूर

व्यापाराला चालना मिळणार

महाराष्ट्र व छत्तीसगडला जोडण्यात भापडा नदीचा मोठा अडसर आहे. कारवाफा, पेंढरी, जारावंडी, कसनसूर या परिसरातील लोकांना भापडा नदीवर पुलाची आवश्यकता आहे. या परिसरातील सर्व व्यवहार छत्तसगडमधील पाखंजूर येथून होतात. त्यामुळे लोकांना ये-जा करायला प्रचंड अचडणींचा सामना करावा लागतो. परिसरात पेट्रोल पंप नसल्याने लोकांना पाखंजूरमधूनच पेट्रोल घ्यावे लागते. पाखंजूरमधील अनेक व्यापारी दुचाकीने येऊन या परिसरात दूध व इतर पदार्थाची विक्री करतात. पावसाळा व हिवाळ्यात त्यांना हे शक्य होत नाही, अशी प्रतिक्रिया जारावंडी येथील शिक्षक राजेश पारडवार, पाखंजूर येथील व्यापारी विपूल विश्वास यांनी दिली.