शहरातील सराफ व्यावसायिक सत्यम शांतिलाल वर्मा (वय ३६, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, मोरया मंगल कार्यालयाजवळ, पाइपलाइन रस्ता, नगर) यांचा औरंगाबाद रस्त्यावर अत्यंत निर्घृणपणे खून करून टाकून दिलेला मृतदेह आढळला. त्यांच्या हत्येबद्दल गूढ निर्माण झाले आहे. पाळत ठेवून हा खून झाल्याचा संशय एमआयडीसी पोलिसांना वाटतो आहे.
वर्मा यांचे शहराजवळील जेऊर गावात वर्मा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चौघे भाऊ मिळून ते चालवतात. सत्यम रोज मोटारसायकलवरून जेऊर ते नगर अशी ये-जा करीत असत. औरंगाबाद रस्त्यावर, वांबोरी फाटय़ाच्या पुढे खिंड नावाचा भाग ‘तारांगण’लगत आहे. रस्त्यापासून सुमारे चारशे फूट आतमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या गळ्यावर, चेह-यावर वार करण्यात आले आहेत व चेहरा दगडाने ठेचण्यात आला आहे. त्यांची मोटारसायकल वांबोरी फाटय़ाजवळील ग्रीनलँड हॉटेलसमोर लावलेली होती.
जेऊर गावातून निघताना सत्यम यांनी घरी मोबाइलवरून कळवले. नंतर त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र रात्री ७ वाजून ४१ मिनिटांनी त्यांनी जेऊर टोलनाका मोटारसायकलवरून ओलांडल्याची नोंद तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात झाल्याचे समजते. रोज साडेसात-आठच्या सुमारास घरी परतणारे सत्यम रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्यांच्या एकत्रित कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध सुरू केली होती. सोमवारी जेऊर गावाची यात्रा होती. तेथेही चौकशी करण्यात आली. परंतु शोध न लागल्याने कुटुंबाने आज सकाळी अकराच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला होता.
त्याच वेळी त्यांच्या भावांना औरंगाबाद रस्त्यावर त्यांची मोटारसायकल दिसली तसेच पोलिसांना औरंगाबाद रस्त्यावर एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. हा मृतदेह कुटुंबीयांनी ओळखला. मृतदेहाजवळ एक रक्त लागलेला कोयताही आढळला तसेच त्यांच्या मोटारसायकलवरही रक्ताचे डाग आढळले. वर्मा कुटुंबाने सुमारे १३ वर्षांपूर्वी जेऊर गावातील पेठीत सराफी दुकान सुरू केले होते. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपअधीक्षक जमादार यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. शहरातील सराफ व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिका-यांनी पोलीस अधिका-यांची भेट घेतली.
दागिन्यांबाबत अनभिज्ञता
तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या तरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणांसाठी खून केल्याची माहिती असल्याचे स्पष्ट केले. सत्यम यांचे काही मित्र व काही नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्यम जरी रोज जेऊरहून ये-जा करत असत तरी ते रोकड किंवा सोन्याचे दागिने बरोबर आणत नसत. दुकानातील तिजोरीतच ते ठेवत असत. पवार यांनीही खुनाच्या वेळी सत्यम यांच्या सोबत रोकड किंवा दागिने होते का याबाबत माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. परंतु काहींच्या माहितीनुसार यात्रा काळात वर्मा यांच्याकडे विक्रीची मोठी रक्कम जमा झाली होती तसेच दागिन्यांची बॅग घेऊन ते घरी परतत होते. त्यामुळेच खुनाचे कारण लूट की अन्य काही याबाबत चौकशी केली जात आहे, असे पवार यांनी सांगितले.