सध्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोल्हापुरातील एका महिलेनं आपल्या १० महिन्यांच्या बाळाला घरी सोडून मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर रवाना झाल्या आहेत. सीमेवर जाताना आपल्या बाळाला कुटुंबाच्या हवाली करताना आईला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव येथील वर्षाराणी पाटील आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून बीएसएफमध्ये दाखल झाल्या. देशसेवेसाठी रवाना होत असताना रेल्वे स्टेशनवर त्यांचं कुटुंब आलं होतं. यावेळी आपल्या मुलाला पाहून वर्षाराणी पाटील यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली. बाळाला कुटुंबाच्या हवाली केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. आईपण बाजुला ठेवून त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी निघून गेल्या. या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं.
वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा अवघ्या दहा महिन्यांचा आहे. या वयात बाळाला सर्वाधिक गरज त्याच्या आईची असते. तरीही वर्षाराणी पाटील आपल्या बाळाला घरी ठेवून कर्तव्यावर रूजू झाल्या. रेल्वेमध्ये बसताना त्यांचं मन आपल्या मुलाच्या आठवणीनं भरून आलं. यावेळी त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजुला ठेवत देशसेवेला प्राधान्य दिलं. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं राज्यभरातून कौतुक होत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.