रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चेंडे यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात होवू घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेली बहुजन समाज पार्टीही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ही मर्चेंडे यांनी सांगितले.

प्रविण मर्चेंडे म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनुसार बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असली तरी महाराष्ट्रातील अलीकडील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी सकारात्मक चर्चा केली जाणार आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवारांवर दबाव, धनशक्तीचा वापर आणि अर्ज मागे घेण्यासाठी होणारे प्रयत्न पाहता बहुजन समाजातील बौद्ध, कुणबी-ओबीसी, अनुसूचित जमाती आणि मुस्लिम समाजाची मते विभागली जाऊ नयेत, हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत बसपाने शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यासोबत निवडणूक लढवत चांगली ताकद दाखवली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहे. बसपा प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर सक्षम पर्याय उभा करेल. बहुजन समाजातील महापुरुषांच्या समता आणि बंधुत्वाच्या विचारांवर पक्ष निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास ही जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चेंडे यांनी व्यक्त केला आहे.