राष्ट्रीय पोषण संस्थेच्या चाचण्यांमध्ये निष्कर्ष; प्राण्यांवर प्रयोग
जनुकीय बदल ( बी.टी. ) वांगे खाण्यास सुरक्षित असल्याचा निष्कर्ष हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशियन ) चाचण्यांमध्ये निघाला आहे.संस्थेचे उपसंचालक डॉ. दिनेशकुमार यांनी एका कार्यशाळेत ही माहिती दिली.
पर्यावरण,वनखाते आणि हवामानातील बदल मंत्रालयाच्या सहकार्याने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात जनुक बदल पिकांच्या चाचण्यांच्या सुरक्षितता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
संस्थेत बीटी वांग्याच्या पोषणमूल्याच्या दृष्टीतून चाचण्या घेण्यात आल्या. उंदीर व काही प्राण्यांवर याचे प्रयोग करण्यात आले. हे वांगे आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षित असल्याचे आढळून आले. त्याआधारे बांगलादेश सरकारने बीटी वांग्याला परवानगी दिली आहे. बांगलादेशातून या वांग्याचे बियाणे भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वदेशी जागरण मंच व ग्रीनपीस यांचा बीटी वांग्याला विरोध असला तरी त्यांच्या म्हणण्याला शास्त्रीय आधार नाही. मात्र त्यांच्या दबावामुळे बिटी वांग्याला परवानगी मिळू शकलेली नाही. असे दिनेशकुमार यांनी स्पष्ट केले.
देशात बीटी सोयाबीनला विरोध केला जात आहे. मात्र परदेशातून येणारे सोयाबीन तेल हे बीटी सोयाबीन पासून तयार केलेले असते.त्याच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत.हे तेलही खाण्यास सुरक्षित आहे. जगातील अनेक देशात त्याच्या चाचण्या घेतल्यावरच त्याचा वापर सुरू झाला आहे. बीटी कापुसही पूर्णपणे सुरक्षित आहे असा दावा त्यांनी केला
जनुकबदल पिकांसाठी सरकारने नियामक यंत्रणा तयार केली असून जागतिक निकष पाळले जात आहेत. या पिकांना परवानगी द्यायची की नाही हा सरकारचा अधिकार आहे. पण कृषी संशोधन संस्थेत त्याचे संशोधन व चाचण्या थांबता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
काय आहे जनुकबदल तंत्रज्ञान?
एखाद्या पिकात जनुकीय बदल करण्यासह पेशींची जनुकीय घडण बदलून जीन्सना प्रजातीमध्ये फिरू देणं. हे तंत्र म्हणजे जनुकीय सुधारणा करणे होय.निसर्गात अस्तित्वात नसलेले जीन्स व गुणधर्माचे नवीन संयुग ह्या बदलामध्ये तयार होतात.जगात १९७३ मध्ये त्याचा पहिल्यांदा यशस्वी वापर करण्यात आला.२००२ मध्ये देशात पहिल्यांदा बीटी कपाशीला परवानगी देण्यात आली. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असल्यामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केल्या जातात. कपाशीच्या पिकात मातीतील एका जिवाणुमधील बॅसिलेंसिस थुरीणजेसीस हा जीन टाकण्यात आला. त्यामुळे कपाशीवर बोडअळी येत नाही.
बीटी वांग्याला विरोध का ?
कपाशीच्या पिकात टाकलेला बॅसिलेंसिस थुरीणजेसीस हा जीन बिटी वांग्यात टाकण्यात आला. त्यामुळे वांग्याला किडीचा प्रादुर्भाव होत नाही.वांग्यात ४५ दिवस प्रोटिनचे प्रमाण वाढते.त्या विषाने कीड मरते. मॉन्सटो व महिको या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन बीटी वांगे तयार केले. पूर्वी पिकाच्या वरून विष मारत होता आता आतून विष देता का असा सवाल ग्रीनपीस व अन्य संघटनांनी विरोध केला. तर शेतकरी संघटनांनी समर्थन केले.पण विरोधामुळे सरकारने परवानगी दिली नाही.
अनेक बिटी पिकांच्या चाचण्या
देशात वांगी, कोबी, एरंडेल, कॉलीफ्लॉवर, काबुली चणे, मका, कापूस, भुईमूग, मोहरी,भेंडी,पपई,तूर, बटाटा,भात, रबर, ज्वारी, ऊस, टोमॅटो, किलगड व गहू या बीटी वाणावर संशोधन झाले आहे.त्याच्या चाचण्या विविध संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावर सुरू आहे पण कुणालाही लागवडीस परवानगी देण्यात आलेली नाही.
