कोल्हापुरातील शिये गावात एक अजब प्रकार घडला आहे. गावातल्या एका म्हशीला कुत्रा चावला. ज्यामुळे रेबीज होऊन या म्हशीचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात आपल्याला रेबीज होईल का ही भीतीच पसरली. याच भीतीतून शिये गावातल्या २०० जणांनी रेबीजची लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. यासंबंधीची माहिती शासकीय विभागांना समजताच तिथले आरोग्य अधिकारीही गावात आले. ज्या नागरिकांनी दूध उकळून घेतलं असेल त्यांच्यासाठी काळजीचं कारण नाही. पण ज्यांनी म्हशीचं दूध न उकळता घेतलं आहे त्यांनी रेबीजचा प्रतिबंध करणारी लस घेणं आवश्यक आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोल्हापूरपासून सहा किमी अंतरावर असलेल्या हनुमान नगर भागातील एका शेतकऱ्याच्या म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्या म्हशीचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात म्हशीचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याची बाब स्पष्ट झाली. गावातले शेकडो गावकरी या म्हशीचं दूध वापरात आणत होते. गावात जशी म्हैस मेल्याची बातमी पसरली तसे गावकरी आपल्याला रेबीज होईल का? या भीतीने घाबरले. त्यानंतर गावकऱ्यांनी रेबीजचा प्रतिबंध करणारी लस घेण्यासाठी थेट दवाखाना गाठला. सध्या शिये गावात याच विषयाची चर्चा आहे.