scorecardresearch

नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा हत्या

मागील काही वर्षांत शहरातील बडय़ा व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावून त्यांतील काहींना ‘लक्ष्य’ बनविण्यात आल्यानंतर याच मालिकेत प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बालाप्रसाद बियाणी (वय ५४) यांची मंगळवारी सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नांदेड : मागील काही वर्षांत शहरातील बडय़ा व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावून त्यांतील काहींना ‘लक्ष्य’ बनविण्यात आल्यानंतर याच मालिकेत प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बालाप्रसाद बियाणी (वय ५४) यांची मंगळवारी सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. या थरारक घटनेनंतर नांदेडचे व्यावसायिक आणि राजकीय विश्व हादरून गेले.

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे भूमिपुत्र असलेले संजय बियाणी यांनी मागील १५ वर्षांत घरे, सदनिका आणि व्यावसायिक संकुलांच्या निर्मितीतून या क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. इतर व्यावसायिकांसोबत राजकीय नेत्यांशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते. गुढीपाडव्यानंतर नव्या वर्षांत त्यांच्या काही नव्या योजनांचा येथे गाजावाजा सुरू असतानाच मंगळवारी सकाळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या आणि कपडय़ाने चेहरा झाकलेल्या दोन तरुण हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करून बियाणी यांना घायाळ केले. या हल्ल्यात बियाणी यांचे वाहनचालक रवि सावंत हे मात्र बचावले.

बियाणी यांचे घर नांदेड उत्तर मतदार संघातील गीतानगर-शारदानगर भागात आहे. मंगळवारी सकाळी ते आपल्या मोटारीतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी गेले होते. सकाळी ११ च्या सुमारास त्यांची नवविवाहित कन्या श्वेता आणि जावई हे दोघे येथून जालन्याला जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे संजय बियाणी खतगावकर यांच्या घरून आनंदनगरमार्गे आपल्या घरासमोर आले. त्यांच्या पाठोपाठ दुचाकीवर आलेल्या दोन तरुण हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या पुढे आपली दुचाकी थांबवली. घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या संजय बियाणी यांच्यावर अगदी जवळून गोळय़ा झाडल्या. हल्लेखोरांनी वाहनचालकावरही गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. या अनपेक्षित हल्ल्यानंतर बियाणी तेथेच कोसळले. गोळीबाराच्या आवाजामुळे बियाणी यांच्या पत्नी धावत बाहेर आल्या; पण तत्पूर्वी दोन्ही हल्लेखोर तरुण मोटारसायलकवरून पसार झाल्याचे सीसी टीव्ही फूटेजमधून दिसून आले.

गंभीररीत्या जखमी झालेल्या संजय बियाणी यांना तत्काळ येथील सनराईज ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; पण प्रत्यक्ष उपचार करण्यापूर्वीच दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या खळबळजनक घटनेची माहिती समजताच शहरातील प्रमुख राजकीय नेते, व्यावसायिक व विविध क्षेत्रातील बियाणी यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व इतर अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले.

या दुर्दैवी घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपली तपास यंत्रणा कार्यरत केली; पण सायंकाळपर्यंत हल्लेखोरांचा ठावठिकाणी लागलेला नव्हता. दरम्यान ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, खासदार चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील यांच्यासह अनेकांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पालकमंत्री अशोक चव्हाण हेही घटना समजल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. दुपारनंतर संजय बियाणी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना

संजय बियाणींच्या रूपात नांदेडने एक सामाजिक संवेदना जपणारा तरुण, होतकरू व्यावसायिक गमावला आहे. शहराच्या सर्वच भागात निवासी व व्यावसायिक संकुले उभी करून त्यांनी अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले व अनेक बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. एक तरुण सहकारी अकाली गमावल्याचे दु:ख आहे, अशा भावना राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, संजय बियाणींच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्याचा सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या घटनेनंतर त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी विस्तृत चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले.

शहरातील उद्योजक व बांधकाम व्यावसायिक यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. मंगळवारच्या या घटनेनंतर नांदेडमध्ये पोलिसांचे नव्हे तर गुंडांचे राज्य सुरू असल्याचे दिसून येते. मागील काळात माझ्या मित्रमंडळातील काही जणांवर असेच प्राणघातक हल्ले झाले होते. आज संजय बियाणी यांना संपविण्यात आले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

– खासदार प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Builder killed nanded professionals ransom threatening ysh

ताज्या बातम्या