बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनाची एक यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये राज्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. इतर २ प्राथमिक आरोग्य केंद्र धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहे.

आरोग्यसेवाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार देण्यात येतात. प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात दिले जाणारे तातडीचे उपचार, रुग्ण रेफरचे प्रमाण, प्रसूती, रुग्णांसाठी असलेली आरोग्य सेवा, परिसर स्वच्छता, उद्यान, अत्याधुनिक यंत्रांचा वापर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती यासह इतर निकषावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. मागील ७ जानेवारी ते १८जानेवारी २०२६ दरम्यान केंद्रीय परीक्षकांनी मुद्देनिहाय तपासणी करुन या संदर्भाचा अहवाल केंद्रीय समितीस सादर केला होता.

या मानकांचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या यादीमध्ये राज्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे त्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्र हे बुलढाणा जिल्ह्यातील तर दोन धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा, खामगाव तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र गणेशपुर व मेहकर तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ, यांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील दहिपाल, अनाळा या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

राष्ट्रीय मानांकनासाठी तालुका आरोग्य अधिकारी चिखली डॉ.ऋषिकेश कणखर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा गारोडे व प्रा.आ.केंद्र किन्होळा चमू, तालुका आरोग्य अधिकारी खामगाव डॉ.अभिलाष खंडारे व वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.एस.तेलंग व गणेशपुर प्रा.आ.केंद्र चमू, तालुका आरोग्य अधिकारी मेहकर डॉ.विजय बलकार वैद्यकीय अधिकारी डॉ.सूरज ठाकरे व जानेफळ प्रा.आ.केंद्र चमू यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरवर्षी ३ लाख

संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना दरवर्षी रुपये तीन लाख हे तीन वर्षाकरिता बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. सदर बक्षीसांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांकरिता सुविधा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.