scorecardresearch

“बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप

Aaditya Thackaray : रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

“बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर नवा आरोप
आदित्य ठाकरे

वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. महाराष्ट्रात रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५० हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र, खोके सरकारमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत. महाराष्ट्राला हवे असणारे प्रकल्प पळवले जात आहेत. नको असलेले प्रकल्प स्थानिकांवर थोपवताहेत, अशी सडकून टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.

“रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहलं होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे,” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“यांचे कारभारात लक्ष नाही”

“बल्क ड्रग पार्क प्रकल्पात सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होते. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने ४० आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण, यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रग पार्क प्रकल्पामुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत, त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले यांना का जमत नाही?, महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

“मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

“महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करत विधानसभेत सांगितलं की, चार लाख कोटींचा प्रस्ताव ते घेऊन आले. २ लाख कोटींच्या प्रकल्पाला चार लाख कोटी सांगणं, हे कोणत्या सरकारला शोभणारं आहे. २ लाख कोटी आणि १ लाख रोजगार उपलब्ध करून देणार प्रकल्प गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bulk drug park project outside maharashtra shivsena leader aaditya thackeray allegation shinde fadnavis government ssa

ताज्या बातम्या