वनकुटे येथील एक हेक्टर ३७ गुंठे वनजमिनीवर अतिक्रमण केल्याचे प्रकरण तालुक्यात गाजत असतानाच वनकुटे येथीलच एका माध्यमिक शिक्षकाने तालुक्यातील मांडवेखुर्द येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बंगला थाटल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
यासंदर्भात पळशी येथील बाळासाहेब गंगाराम निवडुंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मांडवेखुर्द येथील गट नंबर २३९ मधील ६ आर क्षेत्र पोपट दादाभाउ जाधव यांनी सुनील व अनिल गागरे यांच्याकडून खरेदी केले. या जमिनीलगत दक्षिण बाजूस असलेल्या गट नंबर ४८२ मधील १२२ हेक्टर १८ आर पैकी काही शासकीय जमिनीचा जाधव यांनी ताबा घेऊन त्यावर स्वत:चा बंगला थाटला आहे. जाधव हे वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेच्या वनकुटे येथील माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करीत आहेत.
जाधव यांनी अनधिकृतपणे सरकारी पड जागेत बंगला बांधून गुन्हा केला असून दि. ३० जून २००८ च्या शासन निर्णयानुसार हे अतिक्रमण तात्काळ काढणे आवश्यक आहे. पंरतु स्थानिक ग्रामसेवक तसेच तलाठी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. विधिमंडळ सभागृहाने घेतलेल्या निर्णयाची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने विधिमंडळ सभागृह तसेच राज्यपालांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात तक्रारदार निवडुंगे यांनी मांडवेखुर्द ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता जाधव यांच्या बंगल्याची ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही नोंद नसल्याचा अहवाल ग्रामपंचायतीने दिला आहे. तर तहसीलदारांनी पळशी येथील मंडलाधिकाऱ्यांकडून मागविलेल्या अहवालात जाधव यांनी बांधलेल्या पक्क्या बांधकामाचा काही भाग शासकीय जमीनीवर असल्याचेही नमूद केले आहे. तर जाधव यांनी दिलेल्या जबाबात तक्रारदार निवडूंगे हे आपणास जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. निवडुंगे यांच्या तक्रारीनंतर त्यांनी भूमि अभिलेख कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर या कार्यालयाकडून मिळालेल्या नकाशावरून जाधव यांच्या घराची नोंद त्यांनी बांधकाम करण्यापूर्वीच करण्यात आल्याचे दिसून आले. ही नोंेद झालीच कशी असा सवालही निवडुंगे यांनी केला आहे.
सरकारच्या आदेशाला तिलांजली
शासनाच्या विविध विकासकामे तसेच योजनांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शासकीय जमिनींवर अतिक्रमण होउ देऊ नये तसेच झाले असल्यास ते तत्काळ हटविण्यात यावे असा शासनाचा आदेश असतानाही शासकीय कर्मचारीच या निर्णयास तिलांजली देत असल्याचे या प्रकणावरून सिद्घ झाले आहे.