नांदेडजवळ अपघातात ९ ठार

मुखेड तालुक्यातील बारड येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बस व मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन नऊ जण ठार, तर १२ जण जखमी झाले.

मुखेड तालुक्यातील बारड येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बस व मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन नऊ जण ठार, तर १२ जण जखमी झाले. नांदेड-लातूर मार्गावर विष्णुपुरीजवळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघात एवढा भीषण होता, की मिनी बस होत्याची नव्हती झाली. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता, तसेच मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते.
मुदखेड तालुक्यातील बारड येथील रहिवासी उत्तम शहारे (वय ६२) यांचा मुलगा प्रदीप याचा विवाह शनिवारी कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद येथे होणार होता. नवरदेव व काही नातेवाईक शुक्रवारी सकाळीच तेथे पोहोचले. नवरदेवाचे वडील उत्तमराव शहारे, आई, बहीण आणि अन्य वऱ्हाडी दोन खासगी मिनी बसमधून शुक्रवारी सायंकाळी बारडहून निघाले. दोन्ही बस रात्री साडेअकराच्या सुमारास नांदेड-लातूर मार्गावर विष्णुपुरीनजीक विद्यापीठाजवळ पोहोचताच मालमोटारीने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेने बस अक्षरश: फाटली. काही कळायच्या आत बसमधील प्रवाशांपैकी अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात होते, तर नवरदेवाचे वडील उत्तम शहारे, बहीण मथुरादेवी खराडे व योगेश्वरी लेनमोडे (वय ३) ही चिमुकली या तीन जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मरण पावले.

अपघातातील मृत-जखमींची नावे
अपघातात मरण पावलेल्यांची नावे – शिवाजी हरिभाऊ भोकरे (वय ५०), मधुकर हरिभाऊ भोकरे (५८, रुपूर, कळमनुरी), उत्तम वामन शहारे (६५, बारड), पार्वतीबाई गादिलवाड (४५, पांढरवाडी), योगेश्वरी संजय लेनमोडे (५, रिठद, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम), मथुराबाई मनोहर खराटे (पोतरा, कळमनुरी), विजयमाला राजकुमार पोफळे (ब्राह्मणगाव, उमरखेड, यवतमाळ), प्रेमिलाबाई भोकरे (४५, बारड) व खासगी मिनी बसचा चालक बलविंदरसिंघ ऊर्फ कालो (५०). जखमींची नावे – रुद्रप्रताप शहारे (२), सुनीता शिवाजी आगमाने (४५), उज्ज्वला गंगाधर कानडे (१७), अक्षय संजय लेनमोडे (४), शीला गजानन शेहरे (३५), संजय उत्तम लेनमोडे (३८), निर्मला कांबळे (३८), आराधना भोकरे (१५), रमेश कंधारकर, बाबुराव गादिलवाड (पांढरवाडी), जयश्री लेनमोडे, माला अरुण कवडे (११). यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात, तर काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bus motor accident in nanded

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या