सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना फटका

विरार : मुंबई महामार्गावर कांदिवली दरम्यान दरड कोसळल्याने वसई विरारमधून मुंबईकडे जाणारी बस सेवा बंद पडली होती. ती आजही पावसामुळे  बंद राहिली. याचा फटका कामावर जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना बसला आहे. काल अचानक बंद केलेली बस सेवा आज सुरू होईल असे वाटत असताना रात्रभर कोसळलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते बंद झाल्याने आजही  सर्व एसटी बस बंद करण्यात आल्या.

मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला चांगलेच झोडपले. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत कायम असल्याने याचा परिणाम एसटी सेवेवर झाला आहे. करोना काळात मुंबईला कामावर जाण्यासाठी सध्या एसटी बस सेवा हा एकमेव पर्याय आहे.  पण सलग दोन दिवस सतत ही सेवा बंद असल्याने खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सतत दोन दिवस कामावर दांडी बसल्याने त्याचा आर्थिक भारही त्यांना सहन करावा लागत आहे.

वसई विरारमध्ये पावसाचा जोर सतत दोन दिवस कायम आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असल्याने वाहतूक सेवा पूर्णत: कोलमडली. यात विरार आणि नालासोपारा बस आगारात गुडघाभर पाणी जमा होते.

सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना पाऊस बसच्या गोंधळाचा फटका बसला, कारण बस बंद असल्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याने प्रवासी सकाळी भर पावसात आगारात उभे होते. पण बस बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.

नालासोपारा आगाराच्या प्रमुख प्रज्ञा सानप यांनी माहिती दिली की, सध्या पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील अनेक मार्ग पाण्याखाली गेले असल्याने वाहतूक बंद आहे. म्हणून आम्ही बस न काढण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काल रस्त्यात अडकून पडल्याने प्रवासी आणि चालकांना त्रास सहन करावा लागला. रस्ता वाहतूक सुरळीत होईपर्यंत बस बंद राहतील असे त्यांनी सांगितले.

तारेवरची कसरत

अचानक बस सेवा बंद पडल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. आधीच रात्रभर मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले त्यांना कामावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करत बस आगारात जावे लागले पण अचानक बस सेवा बंद झाल्याने त्यांना पुन्हा घरी जाताना तोच त्रास सहन करावा लागला.