मलकापूर येथील एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडांवर उद्योगधंदे उभारले जाणार काय, असा प्रश्न असून मलकापूर एमआयडीसीत सुमारे १६० ते १७० भूखंड अद्यापही निकामी आहेत. या भूखंडांवर उद्योगधंदे उभारल्यास परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील.

मलकापूर शहर हे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने येथून जवळच दसरखेड येथे २०३.३९ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली. यात २०० भूखंड उद्योगांसाठी निर्माण करण्यात आले होते. त्यावेळी अनेक उद्योग सुरू करण्यात आले होते. मात्र, आज छोटे-मोठे ३० ते ४० उद्योगच सुरू असून अनेक उद्योग बंद पडले, तर काही भूखंडांवर एमआयडीसीची निर्मिती झाल्यापासून अजूनही कुठल्याच प्रकारचा उद्योग सुरू करण्यात आलेला नाही. केवळ अत्यल्प दरात जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या स्थापनेनंतर परिसरातील बेरोजगारी मिटण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे.
येथे उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असून पूर्णा नदीचे भरपूर पाणी जवळच आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग केवळ १० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खांदेश, मध्यप्रदेशला जोडणारी ही एमआयडीसी असल्याने उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर वाव आहे. एवढय़ा सुविधा असतानाही ज्यांनी एमआयडीसीमध्ये भूखंड काबीज केले त्यांनी उद्योग उभारण्यासाठी कुठलीही पावले उचललेली नाहीत तर अनेक उद्योग बंद पडले असून काही शेवटची घटका मोजत आहेत. याउलट, तालुक्यातील अनेक गरजू व्यावसायिक एमआयडीसी परिसरात उद्योग उभारणीसाठी धडपडत आहेत. मात्र, त्यांना येथे भूखंड उपलब्ध होत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. आता मात्र महाराष्ट्र शासनाने परिसरातील खाली भूखंडांची माहिती गोळा करणे सुरु केले. त्यामुळे ज्या भूखंडांवर आजपावेतो कोणताही उद्योग सुरू झाला नाही ते भूखंड शासन ताब्यात घेणार असून या भूखंडांचे नव्याने वाटप करणार आहे. त्यामुळे होतकरू उद्योजक आपले उद्योग सुरू करतील व मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याची चिन्हे बळावली असून युवकांसाठी व बेरोजगारांसाठी अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.