शिवसेना आमदार संजय गायकवाड हे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरुन वादात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. १९८८ मध्ये लिहलेल्या या पुस्तकाचा आमदार गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला असून, त्यांनी प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. ज्यानंतर आता राजकारण्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्ही संजय गायकवाड यांना पुस्तक भेट देऊ असं म्हटलं आहे.

यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया काय?

शहीद कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८८ रोजी प्रकाशित झाली. आजवर मराठी, हिंदी, इंग्रजी सह अनेक भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे कार्य, ध्येय आणि उद्दिष्ट समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक मैलाचा दगड म्हणावं असे आहे. आमदार संजय गायकवाड या महाशयांनी हे पुस्तक वाचलं. आणि त्यांना ते आक्षेपार्ह वाटले.. त्यांची समज काय असेल हे दिसतेच. पण प्रकाशकांना घरात घुसून मरतो, जीभ कापतो हा धमकीवजा इशारा हलक्यात घेऊन चालणार नाही. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ याची दखल घेऊन पोलिस कारवाईचे आदेश द्यावेत, प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिस संरक्षण द्यावे. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही!

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव चित्रण कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक तथा पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी “पानसरेचे जे हाल केले, तसे हाल करू” अशी धमकी दिली आहे. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला, त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. असे असताना स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखला देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. धमकी देणाऱ्या आमदार विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. त्यांनी सत्तेसाठी अशा निर्बुद्ध आमदारांना पाठीशी न घालता तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच सत्ताधारी आमदाराकडून जीवाला धोका असल्यामुळे प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे !

Shivaji Kon Hota News
शिवाजी कोण होता या पुस्तकावरुन वाद निर्माण करत संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली आहे. (फोटो-सोशल मीडिया)

प्रकाश आंबेडकरांची भूमिका नेमकी काय?

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.

अमोल मिटकरी पाठवणार पुस्तकाची भेट

सन्माननीय आमदार संजय गायकवाड यांना १९८८ साली लिहिलेले “शिवाजी कोण होता” हे गोविंद पानसरे लिखित पुस्तक व त्याचे मुखपृष्ठ वाचून झालेला उद्रेक व दुखावलेल्या भावना त्यांना त्यांचे व आमचेही दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंचे “दगलबाज शिवाजी” हे पुस्तक लवकरच सप्रेम भेट म्हणून पाठवतोय.#वाचाल तर वाचाल….

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट काय?

संजय गायकवाड आक्षेप -पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला कि, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला.प्रशांत आंबी या प्रकाशकाने भाषेचा स्तर, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला.

अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत. संजय गायकवाड यांच्या विरोधात कारवाईची मागणी विरोधक करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री काही निर्णय घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रशांत आंबी काय म्हणाले?

१९८८ ला हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. मी त्यांना हेच सांगितलं की पुस्तक आधी त्यांनी वाचावं. ३८ वर्षे पुस्तक प्रकाशित आहे. संजय गायकवाड यांनी पुस्तक वाचलेलं नाही. मला जीभ कापतो, घरात घुसून मारतो वगैरे धमक्या दिल्या. आईवरुन आणि बायकोवरुन शिवीगाळ केली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात मी संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे असं प्रशांत आंबी यांनी म्हटलं आहे.