बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, ही निवडणुकीसाठी बारामतीतून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत ही माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. २३ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने हा अपघात आहे की घातपात हा प्रश्न लावून धरला आहे. VSR कंपनी आणि डीजीसीएने निष्काळजीपणा केला असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच विमान उड्डाणाच्या आधी आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवारांचा अपघात झाला की घातपात याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी लावून धरली आहे. आता बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवार यांनी वास्तव कल्पनेपेक्षा भयंकर असतं म्हणत पोस्ट लिहिली आहे.
सुनील तटकरे यांनी काय सांगितलं?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे. २३ एप्रिलला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांची घोषणा झाली तर दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे इथली पोटनिवडणूक आता २३ एप्रिलला पार पडणार आहे.
