महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अखेर उद्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

हेही वाचा- Patra Chawl Land Case: संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

उद्या कोणत्या मंत्र्यांचा शपथविधी होणार? याबाबतची नावं या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. कोणत्याही क्षणी अधिकृतपणे नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ६ ते ७ मंत्री शिंदे गटाचे असू शकतात. १० ऑगस्टपासून राज्यात पावसाळी अधिवेशन होणार आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.