लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : अश्लील कृत्यासाठी कॅफेमध्ये आडोसा करुन दिल्याबद्दल वादग्रस्त कॅफेचालकास सोमवारी पोलीसांनी अटक केली. गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन पीडितेवर पेयातून गुंगीचे औषध देऊन चित्रीकरण करुन लैंगिक अत्याचार झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या युवा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत तीन कॅफेची तोडफोड केली होती.

शहरात कॅफेच्या नावाखाली युवा पिढीला वाममार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित केले जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी युवा शिवप्रतिष्ठानकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दि. १७ मे रोजी पिडीतेने अत्याचार झाल्याची तक्रार देताच संशयित तरुणाला अटक करण्यात आली.

आणखी वाचा-सुरक्षा ठेव, इंधन अधिभार वाढीतून छुपी वीज दरवाढ

पिडीतेच्या तक्रारीमध्ये हँग ऑन कॅफेमध्ये गुन्हा घडल्याचे म्हटले असल्याने कॅफे चालक अनिकेत प्रताप घाडगे (रा. अशोक स्फुर्ती बंगला, रामकृष्ण परंमहंस सोसायटी, १०० फुटी रोड, सांगली) याला विश्रामबाग पोलीसांनी आज अटक केली. त्याच्या हँग ऑन कॅफेमध्ये अपराध करणेकरीता सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्यास दिसू नयेत याकरीता पडदे लावून गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून सहाय्य केले म्हणून त्यास सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

आणखी वाचा-सांगली : गोवा बनावटीचे साडेआठ लाखाचे मद्य जप्त, तिघांना अटक

जिल्हयात अशा प्रकारे कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम, आडोसा निर्माण करून अपराध करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून याबाबत सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधिक्षकांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा कॅफेमध्ये अवैध बांधकाम, आडोसा करण्यात येवू नये यासाठी महानगरपालिकेला कळविण्यात आले असून यासाठी आवश्यकतेप्रमाणे पोलीसांची मदत घेवुन अशा कॅफेची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आंबटशौकिनांना एकांत देण्यास कारणीभूत असणाऱ्या कॅफेचालकावर कारवाईची मागणीही होऊ लागली. महापालिकेकडून तपासणीची मोहीम सुरु करण्यात आल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले.