सातारा : ‘स्वच्छता जिथे ईश्वराचा वास तिथ” या राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ओवीप्रमाणे कार्य करत सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण, बरड पालखीतळांवर पालख्यांच्या पाठी साचलेला कचरा आज स्वच्छता मोहिमेतून हटवण्यात आला. लोणंद पालिकेचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, फलटणचे निखिल मोरे यांनी अन्य यंत्रणांच्या सहभागातून अवघ्या तीन तासांत परिसराची व पालखीतळांची स्वच्छता केली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा येथे चार दिवस होता. लाखो वारकरी, भाविक हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यामुळे पालखीतळ व पालखी मार्गावर मोठा कचरा जमा झाला आहे. या सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची आणि भाविकांची सातारा प्रशासन, अनेक स्वयंसेवी संस्था, पालिका प्रशासन व मार्गावरील ग्रामपंचायतींनी खूपच चांगली व्यवस्था केली होती. त्यामुळे वारकरी आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले.
पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड असे चार मुक्काम झाले. या वेळी मोठ्या संख्येने भाविक येथे आले होते. दैनंदिन व्यवहारातून या परिसरात मोठा कचरा जमा होतो. त्यातून दुर्गंधी निर्माण होते आणि नंतर स्थानिकांना रोगराईला सामोरे जावे लागते. त्यासाठी लोणंद पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक दत्तात्रय गायकवाड यांनी, स्थानिक नागरिक, अनेक स्वयंसेवी संस्थांनी परिसर स्वच्छ केला. सातारा प्रशासनाने सर्व वारकऱ्यांचे मन जिंकले. पालखीच्या प्रस्थानानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबविली. अवघ्या तीन तासांत पालखीतळ स्वच्छ करून नागरिकांना फिरण्यासाठी सायंकाळपर्यंत तो खुला करण्यात आला. पालखीच्या एका दिवसाच्या मुक्कामादरम्यान लाखो वारकरी, भाविक आणि विविध दुकानांमुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले होते. या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेचे कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेत पालखीतळ स्वच्छ केला. पाच ट्रॅक्टर, १६ स्वयंचलित घंटागाड्या, अग्निशामक दल, दोन सेजिंग मशिन आणि जेसीबीच्या साहाय्याने सुमारे पाच टनांहून अधिक कचरा पालखीतळावरून उचलण्यात आला. परिसरातील ग्रामपंचायत, पालिका यंत्रणांकडून सर्व भागातील आणखी दहा ते ते पंधरा टन कचरा उचलण्यात येणार आहे.
लोणंद व फलटण येथील पालिका ७० कर्मचारी, मार्गावरील ग्रामपंचायती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्राध्यापक व इतर कर्मचारी, १५० विद्यार्थी, कागलचे मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांची २५ कर्मचाऱ्यांची टीम, फलटणचे आणि खासगी तत्त्वावरील २५ कर्मचारी, तसेच कराड, महाबळेश्वर, मलकापूर या पालिकांचे १०० कर्मचारी, कचरा संकलनासाठी ५ ट्रॅक्टर ट्रॉली, २ जेसीबी मशिन, १६ घंटागाड्या इतकी वाहने आणि मानवी शक्ती कार्यरत आहे. पालखी तळावरील कचरासंकलन १५ टन झाले.- निखिल मोरे व दत्तात्रय गायकवाड, मुख्याधिकारी, फलटण व लोणंद