Maharashtra Municipal Corporation Election 2026 Ground Reality: काही माणसं अंडी फेकण्यासाठी उभे राहिलेले, उमेदवारी मिळाली नाही म्हणून ज्याला ‘शेर’ म्हणून मिरवायचे, त्याच्या विरोधात रोष व्यक्त करत होते. काही नेत्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ‘इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न’ अशी त्याची बातमी झाली. हे सारे घडत असताना एका गल्लीत इम्तियाज जलील यांचे छायाचित्र फाडण्यात आलं. पायदळी तुडविण्यात आलं. जुन्या २१ नगरसेवकांना तिकीट नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या एमआयएममध्ये कमालीचा रोष दिसत होता. मुस्लिम मतदारांचा प्रभाव असणाऱ्या या पक्षाचा गुंता वाढत होता. आपसात सारे भांडत आहेत, असे चित्र होते.
पुढच्या दोन दिवसांत आमखास मैदानात तरुणांची गर्दी जमलेली. दहा दिशांना मोठ्या मनोऱ्यावर भोंगे लागलेले. आदल्या दिवशी ओवेसींच्या सभेत गोंधळ झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला. लोखंडी जाळी अधिक करकचून बांधलेली. समोरच्या बाजूला २२ ते २५ वर्षे वयोगटाची गर्दी. मागच्या बाजूला गर्दीचं वय फार तर फार ४०. दाढीचे केस पांढरे झालेले अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील. मागच्या बाजूला थंडीत खारेमुरे, बटाट्याचे वफर्स, मुरकुल, चणे, शेंगदाणे, भेळ असे गाडे लागलेले. तिथेही झुंबड उडालेली. एव्हाना तरुण मुलांनी पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात केली. तुम्हारा मेरा रिश्ता क्या—उत्तर येऊ लागले ‘ला इलाह इल्लिलाह’. मग एखादा उमेदवार भाषण करायचा. असं करू, तसं करू असं म्हणायचा. इन्शाअल्लाह सारे वादे पूरे होंगे, असं म्हणायचा. पुन्हा प्रतिसाद यायचा—‘नारा ए तकबीर – अल्लाह हू अकबर’. घोषणांमध्ये जोश वाढवत नेण्यासाठी मग कोणी तरी भाषणाला नवे टोक काढून द्यायचे. या वेळी भाषणात जोर होता तो इत्तेहाद या शब्दाभोवती. इत्तेहाद म्हणजे एकजूट. उर्दूतून होणाऱ्या भाषणांमध्ये समानार्थी शब्दांची रेलचेल असते. लेहजा अधिक भावनिक होतो. हैदराबादनंतर देशात एमआयएमला यश मिळवून देणारा मतदारसंघ हातून गेल्याची खंत नेत्यांच्या भाषणातून क्षणोक्षणी दिसणारी. एकजुटीमुळे पुढे जात होतो. देशात मुस्लिमांचा आवाज मांडणारे कोणी तरी आहे, असे चित्र निर्माण झाले होते. हैदराबादनंतर—औरंगाबादचे नाव सर्वत्र चर्चेत होते. पण तुमच्या अंतर्गत कलहांमुळे आणि गटबाजीमुळे सारे नासवू नका, असे आवाहन ओवेसी बंधू करत होते. सभांची गर्दी वाढत होती. पण या वेळी ओवेसी बंधूंना मोहल्ल्यांमध्ये फिरावे लागत होते. नगरसेवक निवडून आणण्यासाठी मतदारांची एकजूट राखण्यासाठी दमछाक सुरू होती.
एका शहराचे विविध रंग. शहरातील आमखास मैदान हे अलिकडे एमआयएम आणि वंचितच्या नेत्यांच्या सभांचे मैदान. पूर्वी हे मैदान काँग्रेसचे नेते वापरायचे. पण काँग्रेसची शक्ती क्षीण होत गेली. मैदान भरविण्यासाठी लागणारी शक्तीही हरवून बसलेले कार्यकर्ते एमआयएमच्या गर्दीकडे नुसतेच पाहतात. कधी तरी याच गर्दीचा हिस्साही होतात. तसे महापालिकेत काँग्रेसचे १० नगरसेवक निवडून येतात. त्यातील कधी तरी दोन जण धर्मनिरपेक्षतेच्या घोषणा बिषणाही देतात. पण ते अगदीच कोणी नेत्यांनी सांगितले असेल तरच. त्यामुळे मुस्लिम मतांची एकजूट होते आहे, हाच शहराच्या दुसऱ्या भागातील प्रचाराचा मुद्दा.
एका बाजूला मोहल्ल्यांतून फिरणारे असदोद्दीन आणि दुसरीकडे सभा घेणारे अकबरोद्दीन. दुसरीकडे नवहिंदुत्वाची भगवी शाल पांघरून भाषणाला उभे असणारे नितेश राणे. ते सांगत होते. ही निवडणूक म्हणजे खान-बाण आणि हिंदुत्वाची शान अशी बघायला हवी. पण त्यांचा सारा रोख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर. १९८८ च्या दंगलीपूर्वी समान नागरी कायदा करावा म्हणून शिवसेनेकडून तेव्हा मोर्चा काढला गेला होता. त्या दंगलीमध्ये दगडफेक करायला लावणारा व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली. त्या रशीद मामूच्या प्रवेशावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना घेरलेले. जर हे असेच सुरू राहिले तर गावातील सर्व हिंदू देवतांच्या पाट्या नावालाही राहणार नाहीत, अशी भीती ते आपल्या भाषणातून व्यक्त करत होते. हिंदुत्व सोडणारा नेता अशी ठाकरेंवरील टीका सुरू होती. कारण बहुतांश हिंदूबहुल मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत असली तरी ठाकरेंच्या जागा कमी करणे हेच युतीच्या नेत्यांचे उद्दिष्ट. त्यामुळे मुस्लिम एकजूट होऊन शहरावर ताबा सांगेल ही भीती प्रचाराचा मुख्य मुद्दा. भाजपचा प्रचार डिजिटल. योजना मंजूर करू, निधी आणू, पाणी फक्त आम्हीच आणू शकतो—या पातळीवरचा. १०–११ दिवसांनंतर तहानलेल्या शहरात पाण्याचा मुद्दा फक्त आम्हीच कसे सोडवू शकतो, हे सर्वपक्षीय आश्वासन. खरे तर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रगती उच्च न्यायालयात सांगावी लागते आहे, तरीही ते फारसे पुढे सरकत नाही. कंत्राटदार कंपनी सत्ताधाऱ्यांपैकी कोणाच्या लाडाची आहे, असा प्रश्न कोणी विचारलाच नाही. पाणी येईल या आशेवर मतदान करा, असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह. भाजपने मोठी सभा घेण्याचे मात्र टाळले. मुख्यमंत्र्यांचा टॉक शो डिजिटली सर्वत्र दाखवला.
या सगळ्या ‘नरेटिव्ह’मध्ये हरवलेला पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. येथे फक्त निधीची चर्चा. पैसा आणला आहे. पैसा कमी पडू देणार नाही. आम्ही हिंदुत्ववादी, त्यामुळे एमआयएमची ‘पतंग’ ही निशाणी कशी कटली वगैरे सांगण्यातच ही नेतेमंडळी प्रचारात दिसून आली. जे काम भाजप करू असे म्हणून सांगत आहे, तीच कामे आम्ही करतो आहोत, असे सांगत राहणे एवढाच प्रचाराचा मुद्दा. युतीमध्ये हरलेल्या शिवसेनेचा सारा आधार ठाण्याहून मिळणाऱ्या रसदीवर अवलंबून. त्यामुळे भाजपवर फारशी टीका न करता आपला कार्यभाग साधून घेण्यासाठी शिवसेनेतील नेते मश्गुल. संजय शिरसाट यांची मुलगी आणि मुलगा या निवडणुकीत उभे ठाकलेले. आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश, माजी महापौर नंदकुमार घोडले यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. त्यामुळे आपल्या घरच्या मंडळींना निवडून आणण्यासाठी प्रत्येकांनी कंबर कसलेली. टीव्ही सेंटर भागातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा फक्त लाडक्या बहिणींचा प्रभाव असणारी. बाकी शिवसेना म्हणजे निधी आणू, निधी देऊ, एवढ्याच मुद्द्याभोवती फिरणारी. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या घटलीच आणि अजित पवार यांच्या नगरसेवकांची संख्या वाढली तर भाजपला ते हवे आहे. त्यामुळे अजित पवार यांनी ‘वेळ बदलाची’ असे प्रचाराचे घोषवाक्य बनवून ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले. यातील मुस्लिम उमेदवारांची संख्या २९ एवढी आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सध्या चर्चा आहे ती लाडक्या बहिणींची. त्या प्रचारातही अग्रेसर आहेत. महिलांचीच गर्दी वाढती आहे. आता प्रत्येक वॉर्डात वाटपाच्या चर्चेचा जोर आहे. पण प्रचारात शहराच्या विकासाऐवजी भीती दाटून राहावी, असाच प्रचाराचा रागरंग.
