अहिल्यानगरः केंद्र व राज्य सरकारच्या पूरातत्व विभागाने संरक्षित केलेले १०९ गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्यातील ११ गड किल्ले अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मेपर्यंत हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. त्यासाठी या अतिक्रमणांचे सर्वेक्षण व माहिती संकलन संबंधित विभागांनी सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्यानगर शहराजवळ ५२७ वर्षांपूर्वीचा निजामशाह कालीन भुईकोट किल्ला, यादवकालीन हरिश्चंद्रगड (अकोले), मराठ्यांनी मोगलांविरुध्द अखेरची लढाई जिंकलेला खर्डा किल्ला (जामखेड), संभाजी महाराजांना कैदेत ठेवलेला बहादूरगड (श्रीगोंदे), शिवाजी महाराजांनी जिंकलेला रतनगड, सह्याद्रीच्या डोंगररांगातील कुलंग, शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतलेला पट्टा किल्ला (विश्रामगड, अकोले), महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराजवळ असलेला कळसूबाई किल्ला, अलंग किल्ला, गिर्यारोहण्यासाठी प्रसिद्ध मदन किल्ला, कावनई किल्ला असे ११ किल्ले सध्या केंद्र व राज्य सरकारचा पुरातत्व विभाग व वन विभागाच्या ताब्यात आहेत.

याशिवाय आणखी काही संरक्षित वास्तू विविध विभागांच्या ताब्यात आहेत. त्याची माहिती तसेच तेथील अतिक्रमणांच्या माहितीचे संकलन सुरू करण्यात आले आहे. गड- किल्ल्यांच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक अहिल्यानगरमध्ये झाली. यावेळी ३१ मेपर्यंत सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

अतिक्रमणे हटवण्याबरोबरच लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तेथे स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे तसेच पर्यटकांच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महसुल विभागाचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaign of encroachment free on 11 forts in ahilya nagar district till 31st may asj