मुंबईतल्या मीरा रोड या उपनगरीय भागात अमेरिकेहून आलेल्या एका तरुणाने २७ एप्रिलच्या सकाळी दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला. त्याआधी त्याने या दोन्ही सुरक्षा रक्षकांना त्यांचा धर्म आणि नाव विचारलं होतं. तसंच हेदेखील विचारलं होतं की तुम्हाला कलमा पढता येतो का? या तरुणाचं आडनाव अन्सारी आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा दहशतवादी हल्ल्याचा कट तर नाही ना? असा संशय पोलिसांना आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ATS कडे देण्यात आली आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मीरा रोड येथील नया नगर भागात वोक्हार्ट रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाच्या मागे एका इमारतीचं बांधकाम सुरु आहे. २७ एप्रिलच्या पहाटे साधारण ४ च्या सुमारास अन्सारी आडनाव असलेला युवक या ठिकाणी पोहचला. त्याने सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा याच्याशी क्षुल्लक कारणावरुन हुज्जत घातली. त्यानंतर अचानक चाकू काढला आणि त्याच्यावर हल्ला केला. ज्यानंतर सुब्रतो सेन हा सुरक्षा रक्षक बचावासाठी धावला तेव्हा अन्सारी आडनावाच्या तरुणाने त्याच्यावरही हल्ला केला. या घटनेनंतर तिथून त्याने पळ काढला. राजकुमार मिश्रा यांची प्रकृती गंभीर आहे. अन्सारीने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पठण येतं का असं विचारून सुरक्षा रक्षकावर हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच त्याच्याकडे ISIS, जिहाद अशी लिहिलेली नोटसुद्धा आढळली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय माहिती दिली?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सुरुवातीला दोन्ही सुरक्षा रक्षकांना रस्ता विचारला. त्यानंतर तो गेला, थोड्या वेळाने परत येत या दोघांना त्यांचा धर्म विचारला आणि नावंही विचारली. कलमा पठण करता येत नाही म्हटल्यावर हल्ला केला. सध्या जखमी सुरक्षा रक्षकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अन्सारी नावाच्या या हल्लेखोराबाबत पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारी हा २०१९ पर्यंत मध्ये अमेरिकेत होता. तिथे त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो भारतात परतला होता.

मागील काही वर्षांपासून हा तरुण मीरा रोड या भागात एकटा राहात होता.

हल्ला केल्यानंतर पुढील दीड तासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन या तरुणाला अटक केली.

घराच्या झडतीत काय समोर आलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अन्सारी एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे. तसंच या तरुणाने काही महिन्यांपूर्वी कोचिंगचं हे काम सोडलं होतं. ५ मे रोजी त्याने त्याचं मीरा रोड येथील घर रिकामं करावं असं त्याच्या घरमालकाने त्याला सांगितलं होतं अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांना आरोपीच्या घरी काही नोट्स मिळाल्या आहेत. ISIS जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. विज्ञान विषयात त्याने पदवी घेतली आहे. २०१० ते २०१९ अशी नऊ वर्षे अन्सारी नावाचा हा तरुण अमेरिकेत होता. अमेरिकेत त्याला नोकरी मिळाली नाही त्यामुळे तो भारतात परतला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया नेमकी काय?

सेल्फ रॅडिकलायजेशनचं हे प्रकरण आहे. इंटरनेट, पुस्तकं या माध्यमातून हा आरोपी तयार झालेला दिसतो आहे. याला आपल्याला केवळ जिहाद करायचा आहे, म्हणजेच इतर धर्मीयांना मारायचं आहे या मानसिकतेतून त्याने हे कृत्य केलं आहे. याचं कुटुंब परदेशात आहे, हा आरोपीही परदेशात राहिला आहे. आधी तो कुर्ला या ठिकाणी आणि नया नगरला तो राहायला आला. या सगळ्या मागे कोण आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ISIS शी संबंधित प्रपोगंडा व्हिडीओ बघत होता तरुण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारी हा तरुण सोशल मीडियावर ISIS शी संबंधित प्रपोगंडा व्हिडीओज वारंवार बघत होता. तसंच सोशल मीडियावरही त्याने काही पोस्ट लिहिल्या आहेत. या तरुणाने धर्म विचारुन जो हल्ला केला त्यामागे त्याचा हेतू काय? याचा तपास आता पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस यांच्याकडून घेतला जातो आहे.