गर्भलिंगनिदान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा केलेले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना मेडिकल कौन्सिलने निलंबित केला. सुमारे पाच महिन्यांच्या विलंबानंतर त्यांना याबाबतचे आदेश बजावण्यात आले.
गर्भिलगनिदान कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून डॉ. गायकवाड यांच्याविरोधात २००९ मध्ये येथील प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. डिसेंबर २०१३ मध्ये खटल्याचा निकाल लागून न्यायाधीश रा. मा. राठोड यांनी डॉ. गायकवाड यांना दोषी ग्राह्य धरत तीन महिन्यांची कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा झाल्याने त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे याबाबतची माहिती देण्यात आली होती. कौन्सिलने न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत वैद्यकीय परवाना निलंबित केल्याचा आदेश २६ डिसेंबर २०१३ रोजी काढला. जिल्हा शल्यचिकित्सकांना याबाबतचे आदेश देण्यात आले. त्यांनी संगमनेरच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी आता झाली.
डॉ. गायकवाड यांनी सोनोग्राफी यंत्रासंदर्भातील नोंदी ठेवलेल्या नव्हत्या. रुग्णांच्या नोंदीदेखील त्यांनी रजिस्टरला घेतल्या नाहीत. सोनोग्राफी यंत्र बदलताना आरोग्य विभागाची परवानगीदेखील त्यांनी घेतली नाही. त्यामुळे पीसीएनडीटी कायद्याचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात डॉ. कृष्णा वानखेडे यांनी तक्रार दाखल केली होती. यात गायकवाड यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना शिक्षा झाली होती.