ऊसतोडणी मजुराच्या झोपडीला आग लागून तीस वर्षे वयाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर महिलेचा पती व मुलगी दोघेही गंभीर जखमी झाले. तालुक्यातील टाकळीभान येथील कन्या शाळेजवळ आज, रविवारी पहाटे ही घटना घडली. आगीत रेखा दादासाहेब मोरे (वय ३०) यांचा भाजून मृत्यू झाला. तर दादासाहेब गुलाब मोरे (४०), मंदा दादासाहेब मोरे (१०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात औषधोपचार करून नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. दुर्घटनेत सापडलेले हे कुटुंब वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील भटाणा येथील आहे. भटाणा येथील दादासाहेब मोरे हे ऊसतोडणीच्या कामासाठी अशोक सहकारी साखर कारखान्यावर आले आहेत. टाकळीभान येथील तोडणी मुकादम गोरख दत्तू डुक्रे याच्याकडे ते काम करतात. गावातच कन्या शाळेनजीक झोपडय़ा टाकून ते राहतात. काल दिवसभर ऊसतोडणीचे काम करून थकूनभागून कुटुंब झोपडीत झोपले होते. पहाटे झोपडीने अचानक पेट घेतला. गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला जाग आली नाही. त्यात ते गंभीररीत्या भाजले. आजूबाजूच्या तोडणी मजुरांना जाग आल्याने त्यांनी  आग विझवली. आगीत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना अशोक कारखान्याच्या कर्मचा-यांनी रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार सुरू असताना रेखा मोरे यांचा मृत्यू झाला. सुदैवाने बारकू दादासाहेब मोरे (वय १४) हा झोपडीबाहेर झोपला असल्याने तो बचावला. दादासाहेब मोरे व मंदा मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे अधिक औषधोपचारासाठी हलविण्यात आले. दुर्घटनास्थळी तलाठी सुनील पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. तहसीलदार किशोर कदम यांनी मात्र घटनास्थळी भेट दिली नाही. तसेच रुग्णालयात जाऊन साधी चौकशी करण्याचीही माणुसकी दाखवली नाही.