विम्याची रक्कम लाटण्यासाठी कार मालकानेच केली कार चोरीची तक्रार

विम्याची रक्कम लाटण्यासाठी कार मालकानेच कार चोरीची तक्रार केल्याची अफलातून घटना उजेडात आली आहे.

वर्धा : विम्याची रक्कम लाटण्यासाठी कार मालकानेच कार चोरीची तक्रार केल्याची अफलातून घटना उजेडात आली आहे.
वर्धेलगत सावंगी येथे राहणारे पॅट्रीक अखिलेश सिंग यांनी त्यांच्या घराजवळील रिकाम्या जागेत कार ठेवली होती. १४ लाख रूपये किमतीची हुंडाई कंपनीची ही कार रात्री पळविण्यात आली. कारबाबत सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र आढळून न आल्याने तक्रार करीत असल्याचे पॅट्रीक अखिलेश सिंग यांनी सावंगी पोलीसांना सांगितले. 

या गुन्ह्याची माहिती झाल्यावर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी तपास केला. सखोल चौकशी केल्यावर त्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली. ती कार काही अनेक दिवसांपासून तक्रारकर्त्यांने सांगितलेल्या ठिकाणी दिसली नाही. तसेच त्यांच्या घराजवळ वर्गीस मॅथ्यूज व पॅट्रीक सिंग हे काही दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी कारजवळ दिसले होते. दोघेही कारने पुलगावच्या दिशेने गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. तेव्हा पोलीसांनी या दोघांवरच तपासाचा केंद्रबिंदू ठेवला. 

वर्गीस मॅथ्यूज हे पूलगाव येथे एका फर्टीलायजर कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे तिथे कार लपविल्या जावू शकते, असा संशय पोलीसांना आला. पोलीसांच्या एका टिमने वर्गीस मॅथ्यूज यांना सोबत घेवून कंपनीच्या परिसराची बारकाईने तपासणी केली.  वर्गीस मॅथ्यूज त्यावेळी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यामूळे पोलीसांचा संशय गडद झाला.

कंपनीचा कोपरा न कोपरा तपासण्यात आला. तेव्हा खताच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली कार ताडपत्रीने झाकून असलेल्या स्थितीत मिळाली. त्यानंतर  वर्गीस मॅथ्यूज यांची विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने व पॅट्रीक सिंग यांनी कार चोरीचा विमा मिळविण्यासाठी हा बनाव रचल्याचे मान्य केले. सावंगी पोलीसांनी पॅट्रीक सिंग यास ताब्यात घेवून कार जप्त केली. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Car owner filed a car theft complaint to defraud the insurance company srk

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या