scorecardresearch

भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तिघांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनेनंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता

molest a minor girl
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग: भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील चिंचोटी परिसरात घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान घटनेनंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता.

शुक्रवारी रात्री तालुक्यातील चिंचोटी गावच्या रस्त्यावर ही घटना घडली. पिडीत मुलगी कामावरून घराकडे निघाली होती. यावेळी तीन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी मुलीचे तोंड दाबून हातपाय पकडून तिला निर्जन ठिकाणी नेले त्यानंतर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मुलीने बचावासाठी आरडाओरडा सुरु केला. तेव्हा आरोपींनी ओढणीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीचा आवाज गावकऱ्यांनी ऐकला ते तातडीने घटना स्थळी धावून आले. तेव्हा तीनही आरोपी मुलीला सोडून पसार झाले.

आणखी वाचा- अलिबाग: सावित्री नदीतील गाळ उपश्याला सुरवात

गावकऱ्यांनी पाठलाग करून एकास पकडले. त्याला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. उर्वरीत दोन आरोपीही आमच्या ताब्यात द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त गावकऱ्यांना शांत होण्याचे आवाहन केले. पण जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्यामुळे पोलीसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

घटनेनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तीनही आरोपीं विरोधात विनयभंग, अपहरण, आणि जिवघेणा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न यासारख्या कलमा आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे. पोलीस तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 18:28 IST
ताज्या बातम्या