रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकणनगर येथे विजयादशमीच्या सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या पथसंचलनात घुसून एका समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर हिंदू स्माजाच्यावतीने आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत हिंदू समाजाचे काही कार्यकर्ते मध्यरात्री दीड वाजता कोकणनगर येथील मुस्लीम मोहल्ल्यात घुसले. मोहल्ल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली. या प्रकरणी माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह शंभर जणांविरुद्ध तर हिंदू समाजाच्या सुमारे ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणनगर नजिकच्या कदमवाडीमधून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सुरू करण्यात आले. त्यावेळी एका समाजाच्या जमावाणे विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र पथसंचलन संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात एकत्र आले. माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांनी संचलनात घुसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार देण्याची सूचना केली. वरूण सुंदरशाम पंडित यांनी शहर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह १०० जणांवर न्यायसंहिता १८९ (१), १८५(२), १९१(१), १९२, १९५, १९६, ५७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५७/१३७ नुसार गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संघाचे उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मात्र आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस स्थानकातून थेट कोकणनगरकडे धाव घेतली. दरम्यान, चर्मालय येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमाव थेट मुस्लीम मोहल्ल्यात घुसला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकत नसल्याने पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
पोलीस हवालदार उमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह सुमारे चाळीस जणांविरुद्ध बेकायदा जमाव करून मुस्लीम मोहल्ल्यात घुसून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी न्यायसंहिता १८९(२), १९०, १९१(२), १९६, ११८(१), ५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींचा शोध शहर पोलीस करत आहेत.