अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास केतकी चितळेला ताब्यात घेण्यात येईल, असे अकोला पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह शब्दात केतकीने तिच्या सामाजिक माध्यमातील खात्यावर कविता शेअर केली. या प्रकारामुळे राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला. केतकी चितळेच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या असून त्यावरून गुन्हे दाखल करण्याात आले. तिला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. अकोल्यात सुद्धा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरू यांनी खदान पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात भादंवि १५३-अ, ५००, ५०१, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास खदान पोलीस करीत असून आवश्यकता भासल्यास केतकी चितळेला ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुन्हा दाखल झाल्याने केतकी चितळेची अकोलावारी होण्याची शक्यता आहे.

तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार

गोंदिया : रविवारी  राष्ट्रवादी महिला काँग्रेस गोंदिया जिल्हातर्फे केतकी चितळेवर तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला शहराध्यक्षा ममता बैस समाजिक न्याय विभाग सेल तिरोडा शहराध्यक्षा वंदना चौहान,  माजी नगरसेविका  जयश्री उपवंशी, प्रमिला विठोले, दुर्गा चौहान, पुष्पा बैस, लक्ष्मी काबडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.