सांगली : शिंदे-फडणवीस शासनाचा निषेध करीत गद्दार दिन म्हणून सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केल्या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गद्दार दिन पाळत निदर्शने केली. गद्दार सरकार म्हणून घोषणाबाजी करीत असताना खोके सरकार मस्त, महाराष्ट्र त्रस्त अशी घोषणाबाजीही करण्यात आली. इस्लामपूरमध्ये कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर, सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालय, बाळासाहेब ठाकरे चौक, कुपवाड आणि विटा येथे आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा… राष्ट्रवादीने बळकावलेल्या कार्यालय इमारतीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना विनापरवानगी पाच अथवा त्याहून अधिक लोक एकत्रित जमा केले आणि आंदोलन केले म्हणून या सर्व आंदोलकांवर इस्लामपूर, सांगलीतील विश्रामबाग, कुपवाड औद्योगिक वसाहत, विटा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, अभिजित पाटील, उपप्रमुख शंभूराज काटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.