छत्रपती संभाजीनगर : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश बँकांमध्ये रोकड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: अधिक मूल्याच्या चलनाचा तुटवडा जाणवत आहे. दररोज चलनामध्ये व्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना रोकड उपलब्ध करून देण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना किती रक्कम काढायची याची पूर्वसूचना द्यावी लागते आहे. तालुका पातळीवर रोकड व चलन उपलब्ध नसल्याने बँक अधिकारी डिजिटल व्यवहार करा, असा सल्ला देऊ लागले आहेत. चलन टंचाईचा हा कालावधी गेल्या २० दिवसांपासून आहे. आता त्यांची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येते.

रिझर्व्ह बँकेच्या नागपूर विभागाकडून चलन खजिन्याकडे वारंवार विनंती करून चलन मिळत नाही. बऱ्याचदा मागणी आणि पुरवठ्यात तूट असल्याने बँक अधिकारी व कर्मचारी हैराण आहेत. मार्चअखेर म्हणून होणारे शासकीय व्यवहार लांबल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील वेतन काही दिवस लांबलेले होते. सेवानिवृत्तीधारकांनाही चलन उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. विशेषत: ५०० रुपयांच्या नोटा नाहीत, असे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम होळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘गेल्या महिनाभरापासून चलन उपलब्ध होत नाही. नागपूरहून येणाऱ्या चलनांमध्ये मोठी तफावत आहे.’

आसाम, केरळ आणि पोद्दुचेरी येथे ९ एप्रिला मतदान पूर्ण झाले असून पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानाशी चलन तुटवड्याचा संबंध जोडला जात आहे. व्यापारी संजय कांकरिया म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून चलन मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेकदा रक्कम काढण्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागते.’

बँक असोसिएशनचे मार्गदर्शक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, ‘तालुका पातळीवर चलन तुटवडा अधिक असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात जास्त ओरड होऊ शकते. त्यामुळे शहरात थोडेबहुत चलन देण्यात येते. मात्र, ग्रामीण भागातील स्थिती अधिक गंभीर आहे.’